लाखो रुपयाची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

कर्ज देतो त्यासाठी वेगवेगळे कारणे सांगून 3 लाख 92 हजार 850 रुपयांचे ऑनलाईन फसवणूक केल्या प्रकरणी सहा जणांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन जयराम खंदारे हे सेक्टर 34, कामोठे येथे राहतात. त्यांना पर्सनल कर्जाची आवश्यकता असल्याने जस्ट डायल वर पर्सनल कर्जा करता बँकेची माहिती मागितली होती. त्यानंतर त्यांना फोन आला व पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट पाठवण्यास सांगितले. त्यांनी ते पाठवले. त्यानंतर गुगल पे चा स्कॅनर पाठवून त्यावर प्रोसेसिंग फी भरण्यास सांगितली. त्यांनी ती भरली.

पुन्हा ईसीएस चार्जेस करता 17 हजार 250 रुपये भरले. त्यानंतर इन्शुरन्स साठी पैसे भरायला सांगितल्यानंतर त्यांनी कर्ज रद्द करायचे ठरवले. लोन रद्द करण्यासाठी 27 हजार भरावे लागणार असल्याने ते पैसे देखील त्यांनी भरले. पुन्हा एकदा फोन करून कर्ज रद्द करू नका तुमची प्रोसेस झाली आहे असे सांगितले. आणि 18 हजार रुपये इन्शुरन्स साठी भरले. त्यानंतर त्यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यावर एक हजार रुपये जमा झाले व तुमच्या लोनचे पैसे तुम्हाला पाठवले आहेत. उर्वरित पैशांसाठी सिक्युरिटी चार्जेस म्हणून पैसे भरण्यास सांगून त्यांनी ते भरले. काही वेळाने इन्शुरन्स डॉक्युमेंट साठी पैसे भरण्यास सांगितले. असे करता करता सचिन खंदारे यांनी तीन लाख 92 हजार 850 भरले. या प्रकाराबाबत त्यांना संशय आल्याने त्यांनी पुढील पैसे भरले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Exit mobile version