शेअर मार्केटच्या नावाखाली 45 लाखांची फसवणूक

दिघी | वार्ताहर |
शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी तुमचे पैसे गुंतवून 2 टक्के परतावा देतो, असे सांगून जवळपास बाराहुन अधिक जणांची लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिसांनी आरोपी मंझर उल्डे याला अटक केली आहे.
बोर्लीपंचतन येथील अब्दुला दळवी यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अनेक जणांनी उल्डे यांच्याकडे पैसे गुंतवले आहेत. अँजेल ब्रोकिंगच्या माध्यमातून स्टर्लिंग वेल्थ मॅनेजमेंट च्या नावे हे ऑफिस थाटून लोकांचा विश्‍वास संपादन केला. दळवी यांनी सन 2013 मध्ये उल्डे यांच्याकडे पैसे गुंतवले व कंपनीकडून त्याबदल्यात महिना 2 टक्के व्याज मिळेल असे उल्डे यांनी सांगितले होते. त्यानुसार पैसे देखील जमा व्हायचे त्यानंतर पून्हा दळवी यांनी 5 लाख रूपये जमा केले. व कालानंतर व्याजाचे पैसे जमा होणे बंद झाले होते. दरम्यान दळवी यांच्यासह जवळपास 12 जणांनी या बोगस कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार 45 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी मंजर उल्डे यांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप पोमन हे करीत आहेत.

Exit mobile version