| पनवेल । वार्ताहर ।
एआय ट्रेड या अॅप्लिकेशनमध्ये गुंतवणूक करून 12 ते 14 टक्के उच्च परताव्याचे आमिष दाखवून 9 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपाली अमृतकर या करंजाडे, सेक्टर 6 येथे राहतात. त्यांनी सोशल मीडियावर एआय ट्रेडमध्ये गुंतवणूक करून 12 ते 14 टक्के नफा मिळवण्याबाबत जाहिरात पाहिली होती. त्यावर त्यांनी हे अॅपडाऊनलोड केले आणि त्यांचे खाते उघडले. त्यांनी सुरुवातीला गुंतवणूक केली. यावेळी त्यांना अॅपमध्ये गुंतवणुकीचा परतावा दिसत होता. सुरुवातीला पैसे काढून खात्री केली आणि त्यांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले. त्यामुळे त्यांनी पती व सासूचे अकाऊंट अॅपमध्ये सुरू करून गुंतवणूक केली. या तिघांच्या अकाऊंटमध्ये त्यांनी एकूण 9 लाख 15 हजार 645 रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांनी या अॅप्लिकेशनवर पैसे काढण्याची रिक्वेस्ट टाकली. मात्र, त्यांना पैसे काढता येणार नाहीत, असे सांगण्यात आले. तसेच मोबाईल नंबर बंद आढळले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.






