व्यवसायाचे आमिष दाखवित तीन लाखांची फसवणूक

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

बिजनेस ग्रुप वर वेगवेगळे टास्क करण्यास सांगून वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरावयास भाग पाडून 3 लाख 9 हजार 97 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेक्टर-1 कळंबोली येथील ज्योती किशोर कुंभार यांना व्हाट्सअप वर नमस्कार असा संदेश आला. त्यांनी विचारले असता त्यांनी त्यांचे नाव प्रतिभा मोहन असे सांगून त्या एच.आर. डिपार्टमेंट सिक्वेन्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम करत असल्याचे सांगितले व त्यांना 1500 ते 2500 रुपये दिवसाला मिळतील अशी ऑफर दिली. त्यांनी लिंक पाठवली त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांनी टेलिग्राम आयडी दिला. त्यानंतर टास्कचे पैसे देण्यासाठी खाते नंबर दिला. त्यानंतर 150 रुपये खात्यावर पाठवण्यात आले. दिवसाला 25 टास्क पूर्ण केले तर नवीन मित्र अ‍ॅड करू शकता व बेसिक टास्कसाठी प्रत्येकी 50 रुपये मिळतील असे सांगितले.

त्यांना ग्रुपवर वेगवेगळे टास्क येऊ लागले. ते टास्क पूर्ण करून डिजिटल इंडिया ग्रुपवर पाठवू लागल्या. त्यानंतर टास्कचे 1 हजार रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात पाठवण्यात आले. त्यानंतर 1300 रुपये समोरील व्यक्तीने पाठवले. समोरील व्यक्तीने दिलेल्या खात्यावर 600 रुपये भरण्यास सांगितले असता कुंभार यांनी 600 रुपये पाठवले. त्यानंतर 10 हजार रुपयांचा टास्क दिला. त्यांनी 10 हजार रुपये पाठवले. त्यानंतर 98 हजार 699 रुपयाचा टास्क देऊन ते पैसे भरण्यास सांगितले. असे एकूण 3 लाख 9 हजार 97 रुपये कुंभार यांनी भरले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Exit mobile version