। पनवेल । वार्ताहर।
शेअरट्रेडींगमध्ये आमची कंपनी अधिकचा नफा मिळवून देईल, असे आमिष दाखवून खांदेश्वर वसाहतीमध्ये राहणार्या 44 वर्षीय व्यक्तीला साडेबावीस लाखांना फसविण्यात आले आहे. या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस भामट्यांचा शोध घेत आहेत.
खांदेश्वर वसाहतीमधील 44 वर्षीय इसमाला ऑनलाईन ट्रेडींग कंपनीच्या नावाने फोनवर संपर्क साधला गेला. त्यांची फसवणूक करण्यासाठी भामट्यांनी दोन वेगवेगळे मोबाईलनंबर वापरले. मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवरुन अयान अन्सारी व अहमद या दोन व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांचा विश्वास संपादनासाठी इंडीयन डीमॅट खाते असल्याचे सांगण्यात आले. सध्या मिळत असलेल्या नफ्यापेक्षा अधिक नफा अल्ट्रा ग्लोबल मार्केट या कंपनीत पैसे गुंतविल्यास नफा मिळेल, असे सांगून त्यांची साडेअठरा लाख रुपये भरायला सांगितले व त्यानंतर पुन्हा वेगवगेळ्या कारणांद्वारे पैसे मागून साडेबावीस लाखांची फसवणूक केली.