| पनवेल । वार्ताहर ।
सीआयडी अधिकारी असल्याचे भासवून एका भामट्याने व त्याच्या साथीदाराने राईस पुलर स्कीममध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून दोघांकडून तब्बल 22 लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे.
रवी भोईर व वृषभ म्हात्रे अशी दोघा भामट्यांची नावे असून त्यांनी अशाच पद्धतीने इतर अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याचे बोलले जात आहे. 2012 मध्ये कल्पना साळुंखे यांच्या माध्यमातून भामट्या रवी भोईर याने तक्रारदार अशोक बडदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने आपण सीआयडी विभागात नोकरीला असल्याचे सांगत राईस पुलर स्किममध्ये 20 ते 25 लाख रक्कम गुंतवणूक केल्यास कोटीमध्ये रक्कम परत मिळणार असल्याचे आमिष दाखवले होते. या अमिषाला बळी पडून बडदे व कल्पना साळुंखे यांनी त्याला सुरुवातीला 25-25 हजार रुपये दिले. त्यानंतर 2012 ते 2017 या पाच वर्षाच्या कालावधीत बडदे यांनी 15 लाख रुपये तर साळुंखे यांनी 7 लाख रुपये रवी भोईर व वृषभ म्हात्रे यांना दिले. त्यानंतर देखील हे दोघे त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी करत होते. मात्र नफ्याची रक्कम त्यांना कधी मिळेल, याबाबत सांगत नव्हते. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर बडदे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.