ॲडमिशनच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

नर्सरीत मुलांचे ॲडमिशन घेण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने पनवेलमधील नर्सरीचालक महिलेला एक लाखांचा गंडा घातला आहे. पनवेल शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार महिला पनवेल भागात लहान मुलांची नर्सरी चालवते. गेल्या महिन्यात या महिलेला मुलांचे ॲडमिशन घेण्याच्या बहाण्याने एका सायबर चोराने संपर्क साधला होता. या वेळी समोरील व्यक्तीने त्याची पत्नी पनवेलमध्ये राहण्यास असून बॉर्डरवर कामाला असल्याचे सांगितले होते. तसेच मुलांची फी ॲडव्हॉन्समध्ये पाठवत असल्याचा बहाणा करून महिलेला यूपीआय आयडीवरून एक रुपया पाठवण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने एक रुपया पाठवल्यानंतर शाळेच्या फीची संपूर्ण रक्कम पाठविल्यास रक्कम डबल करून पाठविण्याचा बहाणा केला. त्यावेळी महिलेने पुन्हा 48 हजार रुपये पाठवून दिले. मात्र, सायबर चोरट्याने सर्वर डाऊन असल्याचा बहाणा करून पुन्हा दुसऱ्या आयडीवर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यामुळे या महिलेने आणखी ४८ हजार रुपये त्याला पाठवुन दिल्यानंतर दोन वेळेस ४८ हजाराची रक्कम कट झाल्याचे मेसेज तक्रारदार महिलेला प्राप्त झाले.

नर्सरी चालक महिलेने सायबर चोरट्याला आपले पैसे परत करण्यास सांगितले असता, सायबर चोरट्याने नर्सरी चालक महिलेला गुगल-पे वर ४००० टाईप केल्यास त्यांचे पैसे परत मिळतील, असे सांगितले. त्यामुळे या महिलेने ४००० टाईप केल्यानंतर तिच्या खात्यातून आणखी ४ हजार रुपये कट झाले. त्यानंतर नर्सरी चालक महिलेने सायबर चोरट्याकडे आपले पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, त्याने आपला मोबाईल फोन बंद करून टाकला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नर्सरी चालक महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Exit mobile version