पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

पार्ट टाइम जॉब करून महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये कमवू शकता असे आमिष दाखवून एक लाख 11 हजार 400 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सेक्टर दोन, करंजाडे येथील सरिता माधव मासाळ यांना इंस्टाग्राम वर महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये कमवू शकता असे नोटिफिकेशन प्राप्त झाले. त्यानंतर व्हाट्सअप वर तोच संदेश प्राप्त झाला. यावेळी लिंक पाठवून त्यात तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर टास्क पाठवू, त्या टास्कमध्ये जाऊन तुम्ही रिचार्ज करा त्याबद्दल तुम्हाला नफा मिळेल असे नमूद केले होते. त्यानंतर टास्क खेळण्यासाठी 200 चा रिचार्ज करण्यास सांगितले.

रिचार्ज केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या किमतीचे टास्क पाठवले. त्यांनी एक हजार रुपयेचा रिचार्ज केला असता त्या बदल्यात त्यांच्या खात्यावर 2 हजार 100 रुपये प्राप्त झाले. असे करता करता त्यांनी 1 लाख 11 हजार रुपये भरले. त्यांनी टास्क पूर्ण केल्यानंतर त्या लिंक मध्ये असलेल्या खात्यात भरलेल्या एक लाख 11 हजार चारशे रुपयांच्या बदल्यात दोन लाख 41 हजार 900 रुपये दिसत होते. ते काढण्यासाठी लिंक मध्ये असलेल्या चार्ट वरील बटन दाबले असता रक्कम काढण्यासाठी टॅक्स म्हणून 48 हजार 380 रुपये भरा असे दिसत होते. त्यांनी टेलिग्रामद्वारे स्मिथ याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ते पैसे भरण्यास सांगितले. यावेळी त्यांच्या पतीने त्यांना गुंतवणूक करत असलेले टास्क पद्धती फसवी असल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version