। पनवेल । वार्ताहर ।
डेबिट कार्ड द्वारे 84 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शशिकांत सोनवणे हे सेवानिवृत्त असून, खांदा कॉलनीत राहतात. ते बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये रक्कम काढण्यासाठी गेले. त्यांनी एटीएम मशीनमध्ये टाकून पासवर्ड टाकला. मात्र, रक्कम आली नाही. यावेळी सेंटरच्या बाहेर उभा असणारा एक व्यक्ती एटीएम सेंटरमध्ये आला आणि तुमचे पैसे निघत नाहीत का? तुम्ही दुसरे कार्ड टाका असे बोलला. यावेळी सोनवणे यांनी दुसरे डेबिट कार्ड एटीएम मशीनमध्ये टाकून पासवर्ड टाकला. तरी देखील पैसे आले नाहीत. यावेळी त्या व्यक्तीने तुमची स्लिप खाली पडली असे सांगितले. त्यांनी स्लिप उचलली आणि डेबिट कार्ड घेऊन घरी आले. रात्रीच्या सुमारास त्यांना त्यांच्या बँक खात्यातून 84 हजार रुपये वजा झाल्याचे मेसेज आला. अनोळखी व्यक्तीने स्लिप खाली पडली असे सांगून स्लीप उचलण्यासाठी सोनवणे वाकले असता हातचलाखीने त्याच्याकडील डेबिट कार्ड सोनवणे यांना देऊन त्यांचे कार्ड तो घेऊन गेला आणि त्याद्वारे 84 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले.







