| पनवेल | वार्ताहर |
ऐरोलीत राहणाऱ्या एका व्यक्तीला एका दिवसात 30 ते 50 टक्के परतावा मिळवून देण्याच्या प्रलोभनातून तब्बल 18 लाख 90 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागात गुन्हा दाखल आहे. ऐरोलीत राहणारे कपिल शहा यांच्या मोबाईलवर गुंतवणुकीसाठी चांगली संधी असल्याचा मेसेज पाठवण्यात आला होता. तसेच एका दिवसात 30 ते 50 टक्के परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन त्यांना दाखवण्यात आले होते. त्यासाठी एका लिंकवरून गुतंवणूक करावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार शहा यांनी पहिल्या दिवशी दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकण्यात आले होते. शहा यांना त्याच दिवशी दोन हजार 800 रुपयांचा परतावा देण्यात आला होता. त्यामुळे शहा यांनी जवळपास 1 लाख 50 हजारांची रक्कम गुंतवली होती. मात्र, मुद्दल तसेच परतावा हवा असल्यास पुन्हा 5 लाख 40 हजार रुपये गुंतवण्यास सांगण्यात आले. असे करता करता शहा यांच्याकडून तब्बल 18 लाख 90 हजारांची गुंतवणूक करण्यात आली होती. मात्र, सायबर चोरांकडून परताव्यासाठी आणखी 28 लाख रुपये मागण्यात आल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर शहा यांनी नवी मुंबईच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.