बँक लोनच्या नावाखाली फसवणूक

अमर ग्लोबल मोबाईल शॉप व्यावसायिकाचा भांडाफोड

| उरण | वार्ताहर |

सतीश गावंडच्या चिटफंड प्रकरणातून उरण परिसरातील जनता सावरत नाही, तोच उरण शहरातील अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील व्यावसायिकांनी ऑनलाइन मोबाईल खरेदी व बँकमधील लोन प्रकरणातून अनेक ग्राहकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात काही पीडित फसवणूकधारकांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असल्याची माहिती अजय शिवकर या पीडिताने दिली आहे.

या प्रकरणात पीडित अजय शिवकर यांनी आपली कशा पद्धतीने फसवणूक झाली आहे ते सांगताना म्हटले आहे की, मला घरगुती खर्चासाठी पंधरा ते वीस हजारांची गरज होती. मी माझ्या मित्रांना लोनविषयी विचारले होते. अमर केंद्रेला माहिती होताच तो स्वतः माझ्याकडे येऊन त्याने मी हे काम करतो असे सांगितले. तसा तो माझ्या आधीपासून परिचयाचाच होता. त्याने सांगितले की मी मोबाईलद्वारे शेकडो लोकांना लोन दिले, तशी त्याने त्यांची लिस्ट दाखवली. मी विश्‍वासाने त्याला माझे सर्व डॉक्युमेंट्स दिले. सिस्टीम चालत नाही म्हणून माझ्याकडे मोबाईल राहू दे म्हणून त्याने विश्‍वास देऊन मोबाईल स्वतःजवळ ठेवला. त्यानंतर त्याने मला सांगितलं की, तुझ्या मोबाईलवर मी दीड लाखांचे लोन घेतले आहे. एवढी रक्कम तुला तर नको आहे, तू फक्त वीस हजार ठेवून एक लाख तीस हजार मला परत दे, बाकी सगळे लोनचे हप्ते मी स्वतः भरेन, त्याच्या गोड बोलण्यावर आणि त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावर विश्‍वास ठेवून मी एक लाख तीस हजार रुपये त्याला ऑनलाईन परत केले; परंतु दुसरा महिना आल्यावर हप्त्याच्या तारखेला त्याने मोबाईलचा हप्ता भरलाच नाही. उलट, माझ्या अकाऊंटमधील सर्व पैसे हप्त्याच्या रूपाने काढून घेतले. त्यानंतर मला समजले की, माझ्या नावावर एकच नाही तर अजून चार लोन काढलेले आहेत. त्यात दीड लाखाचे कॅश टर्म लोन, दीड लाखाचा मोबाईल, पन्नास हजारांचा मोबाईल, एक साठ हजारांचा लॅपटॉप, अशी पाच ते साडेपाच लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

यासंदर्भात मी उरण शहरातील अमर ग्लोबल मोबाईल शॉप व्यावसायिकांच्या दुकानाकडे आपली फसवणूक झाल्याची माहिती घेण्यासाठी गेलो असता, सदर शॉपचे शटर बंद असल्याचे दिसून आले. एकंदरीत, माझ्याप्रमाणे जवळ जवळ 300 जणांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तरी, उरण पोलिसांनी याप्रकरणी लक्ष केंद्रित करावे जेणेकरून यापुढे कोणाचीही फसवणूक होणार नाही, असे आवाहन शेवटी फसवणूक झालेल्या अजय शिवकर यांनी केली आहे.

Exit mobile version