। पनवेल । वार्ताहर ।
मॅक्स लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी रद्द होत असल्याचे सांगून एका टोळीने कामोठेत राहणार्या एका व्यावसायिकाला पॉलिसीची 17 लाख रुपयांची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून तब्बल 5 लाख 93 हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. कामोठे पोलिसांनी या टोळी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणात फसवणूक झालेल्या मुमताज इसार अहमद (40) याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून, तो कामोठे येथे राहण्यास आहे. मुमताज याने 2013 मध्ये मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी काढली असून तो प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्ये 25 हजार रुपये हप्ता भरत होता. सदर पॉलिसीत 10 वर्षे पैसे भरल्यानंतर ती पॉलिसी 20 वर्षानंतर मॅच्युअर होणार होती. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागल्याने मुमताज याने पॉलिसीची रक्कम भरली नव्हती. याचा फायदा उचलत फसवणूक करणार्या एका टोळीने मुमताजला संपर्क साधून त्याची मॅक्स लाईफ इन्शुरन्स पॉलिसी बंद होत असल्याचे सांगितले. सदर पॉलिसीची 17 लाखांची रक्कम मिळविण्यासाठी पॉलिसीचे राहिलेले हप्ते भरण्यास सांगून 50 हजार पाठविण्यासाठी त्याला बँक अकाऊंट नंबर दिले. यावेळी बोलण्यावर विश्वास ठेवून मुमताज याने हप्त्याची रक्कम पाठवून दिल्यानंतर पॉलिसीची बोनस रक्कम मिळेल असे आमिष दाखवून रक्कम भरण्यास भाग पाडले. त्यानंतर इतर सदस्यांनी मुमताजला संपर्क साधून पॉलिसी मॅच्यरिटीसाठी, जीएसटीसाठी वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून एकूण 5 लाख 93 हजाराची रक्कम उकळली.
रद्द झालेल्या पॉलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
