। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघरमधील एका सदनिकेच्या व्यवहारात तब्बल 63 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी दोन बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसर येथील प्रकाश जगराम मिश्रा (69) यांनी 2015 मध्ये खारघर सेक्टर-35 मधील ड्रीम कॉर्नर इमारतीतील रूम क्रमांक 101 खरेदीसाठी 63 लाख रुपये अदा केले होते. हा व्यवहार नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे त्यांच्या नावावर करण्यात आला होता. तथापि, सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा न देता संबंधित सदनिका दुसऱ्याच व्यक्तीला विकण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात अरशद कुरेशी आणि मेहबाज कुरेशी (मालक, मेसर्स जन्नत एंटरप्रायझेस) यांच्यावर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच, घेतलेली रक्कमही परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर खारघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबई आणि पनवेल परिसरात घरांच्या वाढत्या किमतीमुळे खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी मालमत्ता व्यवहार करताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.







