आरटीई प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ
| रागयड | प्रतिनिधी |
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील 25 टक्के राखीव प्रवेशासाठी सध्या ऑनलाइन अर्ज करणे सुरू आहे. या ऑनलाइन प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतराची एक किलोमीटरची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना एक ते पाच किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे. अर्जात दुरुस्ती किंवा नवीन अर्ज करण्यासाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील आठ हजार 899 शाळांमधील 1 लाख 14 हजार 732 राखीव जागांसाठी 2 लाख 40 हजार 411 पालकांनी राखीव प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत वाढविण्यात आल्याने अर्ज संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, 12 फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार आरटीई प्रवेशासाठी पालकांना केवळ निवास स्थानापासून एक किलोमीटर अंतरातील शाळाच निवडण्याची मुभा होती. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत एक किलोमीटरची सक्ती योग्य नसल्याचे स्पष्ट केले. जर एखाद्या विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसेल, तर त्या विद्यार्थ्याला अधिक अंतरावरील शाळेत प्रवेश घेण्यापासून रोखणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे शासनाने नियमांमध्ये सुधारणा करून पालकांना अधिक अंतरावरील शाळांचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले.
आता प्राधान्याने एक किलोमीटर, त्यानंतर तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतरातील शाळांचे पर्याय पालकांना निवडता येणार आहेत. तसेच 16 मार्चपर्यंत ज्या पालकांनी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत, त्यांना अर्ज अनकन्फर्म करून पुन्हा कन्फर्म करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पालकांना पोर्टलवर पॉप-अप विंडोच्या माध्यमातून सूचना देण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यातून प्रवेशाच्या दुप्पट अर्ज
आरटीई प्रवेशात रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील 270 शाळांमध्ये देखील सामान्य कुटुंबातील चार हजार 784 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. आतापर्यंत आठ हजारांहून अधिक पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. मुदतवाढीमुळे पुढील पाच दिवसांत आणखी अर्ज वाढतील. प्रवेश क्षमतेच्या दुप्पट अर्ज असल्याने मोफत प्रवेशाची लॉटरी कोणाला लागणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
