| नेरळ | प्रतिनिधी |
कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वर्षांपासून रुग्णांना मोफत रक्ततपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, मागील आठवड्यापासून ही सेवा अचानक बंद झाल्याने परिसरातील गरीब, आदिवासी तसेच सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली मोफत रक्ततपासणी सेवा ही गरीब रुग्णांसाठी मोठा आधार होती. मात्र, ही सेवा बंद झाल्याने रुग्णांना तपासण्यांसाठी बाहेर जावे लागत असून त्यांचा आर्थिक खर्च आणि वेळ दोन्ही वाढत आहेत. विशेषतः गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तापाचे रुग्ण तसेच दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मोफत प्रयोगशाळा तपासणी सेवा सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीनेही राबवली जाते. या व्यवस्थेत खासगी सेवा पुरवठादारामार्फत प्रयोगशाळा सेवा उपलब्ध करून दिली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर रक्तनमुने संकलित करण्यासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. कळंब सारख्या आदिवासीबहुल भागात मोफत रक्ततपासणी सेवा बंद होणे ही गंभीर बाब आहे. शासन एका बाजूला ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे धोरण राबवत असताना दुसऱ्या बाजूला उपलब्ध असलेली सेवा बंद पडत असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी रजेवर असल्याने माझी या प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ दिवसांपूर्वीच तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मोफत रक्ततपासणी सेवा बंद होण्यामागील कारणांबाबत मला सध्या माहिती नाही.
डॉ. स्वप्नील श्याम रोकडे,
प्रभारी आरोग्य अधिकारी
