| पाली | प्रतिनिधी |
दहावी आणि बारावी या दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला महत्वपूर्ण वळण मिळत असते. मात्र दहावी, बारावीनंतर नेमके कोणते शिक्षण घ्यावे? कोणते कोर्स करावे? याबाबत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नसते. त्यामुळे आपला कल, आवड, बुद्धिमत्ता, क्षमता यांचा विचार न करता विद्यार्थी चुकीच्या क्षेत्राची निवड करण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि करिअर यशस्वी व्हावे, यासाठी त्यांना शिक्षण, करिअरची निवड करण्याअगोदरच योग्य ती माहिती व्हावी. त्यांचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण व्हावे आणि करिअर योग्य पद्धतीने निवडावे, यासाठी सुधागड तालुका मराठा समाजाच्या वतीने स्वर्गीय सटुराम सखाराम साजेकर सभागृह, मराठा समाज भवन, पाली, तालुका सुधागड येथे रविवार दि. 21 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वा. ‘विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा राजमार्ग’ हे विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरात प्रसिद्ध लेखक, सजग नागरिक मंच चे अध्यक्ष, करिअर मार्गदर्शक व्याख्याते माननीय विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना व पालकांना या शिबिरात मा. वेलणकर सरांना आपले प्रश्न/ शंका विचारण्याची संधी मिळणार आहे. या विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबिरात सुधागड तालुक्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांची माहिती घेऊन योग्य पर्यायाची निवड करावी आणि जीवनात यश संपादन करावे. त्याचप्रमाणे सर्वांनी या विनामूल्य मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी आपले व पालकांनी आपल्या मुलांचे भवितव्य घडवावे, असे आवाहन सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी केले आहे.







