जंजिरा किल्ल्यात विनामुल्य प्रवेश

जागतिक वारसा दिनानिमित्त पुरातत्व विभागाचा उपक्रम

। कोर्लई । वार्ताहर ।

(दि.18) एप्रिल हा जागतिक वारसा दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना पुरातत्व विभागातर्फे प्रवेश मोफत देण्यात आला. पर्यटक वाढीसाठी व पर्यटकांना गड, दुर्ग किल्ल्यांची ओळख व्हावी, यासाठी पुरातत्व विभागातर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो.

पृथ्वीवरील सांस्कृतिक वारसा आणि विविधता यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी (दि.18) एप्रिल या दिवशी, ‘वर्ल्ड हेरिटेज डे’ म्हणजेच जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा युनेस्कोद्वारे साजरा केला होता. लोकांना तसेच स्थानिक नागरिकांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे, विविध स्मारकांच्या जतनाचे महत्त्व समजण्यासाठी आणि ते जपण्यास प्रेरणा देणे, असा या दिवसाचा हेतू आहे. 1983 सालापासून स्मारके आणि साइट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेने थीम ठेवण्यास सुरुवात केली. त्या थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो. यंदा वर्ष 2024 ची थीम ही व्हेनिस चार्टरच्या दृष्टीतून आपत्ती आणि संघर्ष अशी ठेवण्यात आली आहे.

मुरूड -राजपुरी येथील ऐतिहासिक नबाबकालिन प्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. हे किल्ले पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना चांगल्या प्रकारे ओळख व्हावी व त्याचे महत्त्व समजावे म्हणून पुरातत्व विभागातर्फे हा दिवस जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो.

Exit mobile version