मोफत नेत्र शिबिरात 95 रुग्णांची तपासणी; 40 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहरात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व माणगावमधील प्रसिद्ध उद्योजक विजय मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवारी (दि.10) सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर महेंद्र मेथा यांच्या प्रशस्त जागेत हॉलमध्ये जुने एसटी स्टॅन्डजवळ माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवीन 95 रुग्णांची तपासणी करून 40 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
माणगावात गेली तीन वर्षांहुन अधिक काळात 42 वेळा शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व माणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आतापर्यंत 3013 हुन अधिक नेत्ररुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेले आहेत.
दक्षिण रायगडातील माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, रोहा आदी तालुक्यांतील गेल्या तीन वर्षात 3013 हुन अधिक रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिरात यशस्वीपणे करण्यात आली. गोरगरीब जनतेला दृष्टी मिळाल्याचा आनंद वेगळाच असून जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून यापुढेही आपण हे शिबीर राबविणार. तसेच, माणगाव तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा आपला मानस असल्याचे विजय मेथा यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले.






