मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी वर्षभर मोफत मार्गदर्शन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| चिरनेर | प्रतिनिधी |

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडेच्या पुढाकाराने व शोभा मेमोरियल फाऊंडेशनतर्फे ‘सुपर थर्टी’ या उपक्रमांतर्गत बारावी सायन्स उत्तीर्ण मेडिकल आणि इंजीनिअरिंग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत नीट व जेईई परीक्षेसाठी वर्षभर मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. शोभा मेमोरियल फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम देशभरात दहा ठिकाणी चालू आहे.

या उपक्रमांतर्गत उरण तालुक्यातील विज्ञान शाखेच्या सर्व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य/शिक्षक यांची एक बैठक घेऊन उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर दि. 21 एप्रिल रोजी बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रकल्पाची माहिती दिली.

बारावी उत्तीर्ण झालेल्या मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्नपूर्ती करण्यासाठी शोभा मेमोरियल फाऊंडेशनतर्फे सुपर थर्टी या उपक्रमांतर्गत वर्षभर निवासी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

गरीब व गरजू इच्छुक विद्यार्थ्यांतील गुणवंत तीस विद्यार्थी नीटसाठी व तीस विद्यार्थी जेईई परीक्षेच्या तयारीसाठी परीक्षा घेऊन निवडले जातील. परीक्षा बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेचे गुण व विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी निवासी प्रशिक्षण दिले जाईल, त्यामध्ये अभ्यासक्रम शिकविणे, उजळणी परीक्षा, गृहपाठ, शंका निरसन, सराव परीक्षा इत्यादी तयारी करून घेतली जाईल.

सुपर थर्टीसाठी इच्छुक विद्यार्थी व त्यांचे पालक यांची बैठक दि. 20 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता वीर वाजेकर महाविद्यालयात आयोजित केलेली आहे. पालकांना या उपक्रमाची माहिती दिली जाईल व त्याच वेळेस विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया परीक्षा ही घेतली जाईल.

मेडिकल व इंजिनिअरिंगचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व दि. 20 मे रोजी महाविद्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन शोभा मेमोरियल फाऊंडेशनच्यावतीने आशिष गुप्ता व डॉ. आमोद ठक्कर प्र. प्राचार्य वीर वाजेकर महाविद्यालयाकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version