माळरानावर फुलपाखरांचा मुक्तसंचार

| माणगाव | प्रतिनिधी |

परतीचा पाऊस सुरू झाला आहे. सकाळ, संध्याकाळी पावसाळी वातावरण व दिवसभर तळपणाऱ्या उन्हामुळे माळराने, शेतशिवारात मोठ्या प्रमाणात चतुर, फुलपाखरे यांचे आगमन झाले असून, माळरानात चतुर व फुलपाखरांची भिरभिर सुरू झाली आहे. पावसाळ्यात भातशेती तयार झालेल्या हंगामात मोठ्या प्रमाणात चतुरांचे, फुलपाखरांचे आगमन होत आहे. छोट्या आकाराचे, सर्वत्र भिरभिरणारे चतुर, फुलपाखरे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तालुक्यात खरीप हंगाम सुरू असून, अनेक लहान-मोठे चतुर, फुलपाखरे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. या चतुर, फुलपाखरांमध्ये विविध रंग, आकार व प्रकर दिसत आहेत. अंगावर ठिपके असणारे फुलपाखरू, नक्षीदार, जाळीदार चतुर पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे पशुपक्षी, कीटक निरीक्षक यांना चतुर, फुलपाखरे निरीक्षणाची मोठी पर्वणी लाभत आहे.

सध्या माळरानात, शेतातून विविध प्रकारची फुले, धान्य बहरली आहेत. या फुलांमधील रस चोखण्यासाठी फुलपाखरे, चतुरांचे आगमन झाले आहे. ते विविध फुलांवर, धान्याच्या पातीवर भिरभिरत असताना पाहणे अत्यंत मनोहारी असून, त्याचे छायाचित्रण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

चतुरांच्या जगभरात हजारो जाती
जगभरात चतुरांच्या पाच हजार पाचशे जाती आढळतात. जवळपास पाचशे जाती भारतात आढळतात. चटकचांदणी नावानेही ते ओळखले जातात. त्याच्या दोन्ही डोळ्यात मिळून 30,000 नेत्रिका असतात. पंख पातळ, जाळीदार व पारदर्शी असतात. झाडावर किंवा जमिनीवर बसताना चतुर आपले पंख पसरून बसतात. हवेतल्या हवेत भक्ष्य पकडणारा चतुर एकमेव कीटक आहे. चिलटे, माशा, डास इत्यादी कीटक ते खातात. प्रौढ चतुर काही आठवडे ते काही महिने जगतात.

14 दिवसांचे आयुष्य
फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी व कोष अशा अवस्था असतात. विशिष्ट जातीची फुलपाखरे विशिष्ट झाडावर अंडी घालतात. पानांशी मिळताजुळता त्यांचा रंग असतो. अळी सुरवंट हा खूप खादाड असतो. सुरवंट मोठा होताना तीन ते चार वेळा शरीरावरील आवरण काढून टाकतो. कोष अळीच्या पूर्ण वाढीनंतर फुलपाखरात रूपांतर होते. अनुकूल वातावरणात फुलपाखरू कोशातून बाहेर पडते. आकर्षक रंग असलेली कीटक फुलपाखरे मिशानी वास घेतात, पायाने चव ओळखतात. त्यांचे आयुष्य 14 दिवसांचे असते. भारतात 1500 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. 17 किलोमीटर प्रतितास फुलपाखरू उडू शकते.ते मधमाशीप्रमाणे फुलांमधील रस शोषतात.

भरपूर खाद्य व योग्य वातावरण असल्याने या हंगामात मोठ्या प्रमाणावर फुलपाखरे, चतुर दिसून येत आहेत. माळरानावर हे दृश्य पाहणे अत्यंत मनवेधक आहे. यावर अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.

राम मुंढे, पशुपक्षी निरीक्षक, पर्यावरप्रेमी

फुलपाखरे, चतुर अन्नासाठी या भागात दिसून येतात. या हंगामात माळरानावर मोठी संख्या दिसून येते. भातकापणीच्या हंगामामध्ये दरवर्षी यांची मोठी संख्या दिसून येते.

विलास देगावकर, पर्यावरणप्रेमी
Exit mobile version