कृषी विभागामार्फत शेतकर्यांना मोफत बियाणे वाटप
| अलिबाग । प्रतिनिधी ।
फळपिकाबरोबरच आता कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभाग कामाला लागले आहे. जिल्ह्यातील हरभरा पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर या विभागाने भर दिला आहे. 980 हेक्टर क्षेत्रामध्ये हरभर्याची लागवड करण्याचा उद्देश असून शेतकर्यांना मोफत बियाणे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. या पीक लागवडीतून शेतकर्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 780 क्विंटल बियाणे उपलब्ध असून तालुका स्तरावर वितरण वेगाने सुरु केले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये भात पिकानंतर वाल, हरभरा, मुग, चवळी अशा अनेक कडधान्यांची लागवड केली जाते. या पिकांतून शेतकर्यांना उत्पन्नाचे साधन खुले होते. पावसाळी हंगाम संपला असून आता थंडीचा हंगाम सुरु झाला आहे. या रब्बीच्या हंगामात कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याबाबत शेतकर्यांना प्रोत्साहित करण्याचे कामही कृषी विभागामार्फत केला जात आहे.
राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांना हरभरा कडधान्य वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. एकूण 780 क्वींटल बियाणे जिल्ह्याला प्राप्त झाले असून तालुका स्तरावर त्याचे वितरण झाले आहे. तालुकास्तरातूनही शेतकर्यांना ही बियाणे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याला हरभरा लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये अलिबाग पेण, रोहा, सुधागड, कर्जत, माणगाव या तालुक्यांमध्ये शंभर ते 110 हेक्टर, महाड, खालापूर, पनवेल, या तालुक्यात 50 ते 80 हेक्टर, तसेच मुरूड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, उरण या तालुक्यात 20 ते 40 हेक्टर क्षेत्रामध्ये हरभर्याची लागवड केली जाणार आहे. हेक्टरी 75 किलोप्रमाणे प्रत्येक तालुक्यात एक हजार 500 किलो पासून सात हजार 500 किलो बियाणे देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
पहिल्यांदाच मसूर मिनीकट
हरभर्याबरोबरच या वर्षी पहिल्यांदाच मसूर कडधान्यदेखील देण्यात आले आहे. 292 क्विंटल मसूर कडधान्य उपलब्ध असून चार हजार 500 हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड केली जाणार आहे. मसुर मिनीकीटचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.
कडधान्य पिकांच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी तसेच या लागवडीतून शेतकरी आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी रब्बी हंगाम कडधान्य पीक लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. मसूर कडधान्याचे कीट उपलब्ध असून त्याचे वाटपही झाले आहे. शेतकर्यांचा फायदा होईल असा विश्वास आहे.
– प्रवीण थिगळे,
उपसंचालक, आत्मा






