कोलाड परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित

नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त

। कोलाड । वार्ताहर ।

कोलाड सबस्टेशनमधून कोलाड खांब परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे याचा नाहक त्रास या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असून, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोलाड खांब परिसरातील अनेक गावे ही ग्रामीण भागात वसलेली आहेत, त्यामुळे येथे ऐन पावसाळ्यात नेहमीच विजेचा सावळागोंधळ सुरु आहे. या परिसरातील वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील नागरिकांना रात्री-अपरात्री अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, यावर नियंत्रण कोणाचे? तर, दुसरीकडे विद्युत महामंडळाच्यावतीने नेमण्यात आलेले खासगी कर्मचारी हेदेखील वेळीच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करत नसल्याने याची अधिक मोठी समस्या ग्राहकांसमोर उभी राहात आहे.

वीज ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज बिल वेळेवर भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा तगादा लावणारे कर्मचारी विजेच्या बिलात सर्व कर आकारणी घेतात, मग त्या ग्राहकाला समाधानकारक सुविधा देण्यासाठी अथवा सेवा देण्यास टाळाटाळ का केली जाते, यावर नियंत्रण कोणाचे, असा सवाल उपस्थित होत आहे. तर, खासगी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यामुळे हे खासगी कर्मचारी मनमानी पद्धतीने कामे करत आहेत, त्यामुळे परिसरातील नागरिक कमालीचे संतप्त झाले आहे.

Exit mobile version