| शिहू | प्रतिनिधी |
शिहू विभाग परिसरात सद्या वीज वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकदा का वीजपुरवठा खंडीत झाला की, तो परत येण्यास अनेक तास वाट पाहावी लागत आहे. मध्यरात्री, पहाटे, दुपारी आशा कोणत्याही वेळेला वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिक पुरते त्रस्त झाले असून, त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर अनेक तास वीजपुरवठा बंद करण्यात येतो. रात्री अपरात्री वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. विशेष म्हणजे वारा अथवा पाऊस नसतानाही वीज गुल होत आहे. सद्या उष्णतेची लाट सर्वत्र असून त्यात भरीसभर वारंवार वीज खंडित होते. त्याचा सामना जेष्ठ नागरिक, गरोदर महिला व लहान मुलांना करावा लागत आहे. महावितरणाच्या या गलथान कारभाराने जणू काही शिहू विभागात अघोषित लोडशेडींग करण्यात येत असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. मागील काही दिवसांपासून तर विद्युत दाब अचानक कमी जास्त होणे यासारखे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. वेळी अवेळी वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे याचा विपरीत परिणाम विजेवर चालणाऱ्या उपकरणांवर होत आहे. वीज देयक वेळेत न भरल्यास उपस्थित होणारे महावितरनाचे अधिकारी ग्राहकांच्या संपर्काला प्रतिसाद का देत नाहीत. वीज बिलाच्या वसुलीसाठी इशारा देणाऱ्या महावितरण मंडळाची सुरळीतपणे वीजपुरवठा करण्याची जबाबदारी नाही का? असा सवाल नागरिकांकडून होत आहे.
शिहू विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित
