मिनीट्रेनमधून प्रवाशांची सर्रास वाहतूक

बंदी असतानाही दर शनिवारी पर्यटकांची वाहतूक

| नेरळ | प्रतिनिधी |

जगभरातील आबालवृद्ध पर्यटकांची लाडकी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन बंद आहे. 7 जूनपासून 15 ऑक्टोबरपर्यंत मिनीट्रेन सुट्टीवर जाते. या काळात कोणत्याही पर्यटक अथवा प्रवाशांना मिनी ट्रेनमधून प्रवास करता येत नाही. मात्र, दर शनिवारी नेरळ येथून एम्टी रेक म्हणून चालविली जाणारी मिनी ट्रेन प्रवाशांनी भरून जात आहे. दरम्यान, याबद्दल मध्य रेल्वे प्रशासन नेरळ-माथेरान मार्गावरील प्रबंधकांची चौकशी करणार आहे काय, असा सवाल सर्वसामान्य पर्यटक विचारत आहेत.

नेरळ-माथेरान-नेरळ अशी 21 किलोमिटर अंतरावर चालविली जाणारी मिनी ट्रेन दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने बंद असते. त्या काळात माथेरान अमन लॉज शटल सेवेसाठी चालविली जाणार्‍या ट्रेनचे डब्बे आणि इंजिन बदलावे यासाठी रिकामी गाडी दर शनिवारी सकाळी नऊ वाजता नेरळ येथून माथेरान जाते आणि संध्याकाळी माथेरान येथून पुन्हा नेरळ येथे परत येते.पावसाळ्यातील या काळात चार महिने मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ अशी वाहतूक बंद असते. त्या कालावधीत शनिवारी रिकामे डबे घेऊन जाणार्‍या मिनी ट्रेनमधून कोणत्याही प्रवाशाला प्रवास करता येणार नाही, असे मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे. हा शिरस्ता गेली अनेक वर्षे मध्य रेल्वेकडून पाळला जात असून, चार महिने कोणत्याही प्रवाशाला मिनी ट्रेनचे नेरळ- माथेरान मार्गावरील तिकीट दिले जात नाही आणि नेरळ येथील तिकीट खिडकीदेखील बंद ठेवली जाते.

मात्र, यावर्षी सातत्याने दर शनिवारी नेरळ येथून सुटणार्‍या एम्टी रेक या गाडीमधून सर्रास प्रवासी प्रवास करीत आहेत. दर शनिवारी 20 ते 30 या संख्येने प्रवासी नेरळ-माथेरान असा प्रवास करतात. हे प्रवासी कोणत्याही तिकिटाशिवाय नेरळ ते माथेरान असा प्रवास करतात. त्याचवेळी त्या सर्व प्रवाशांना नेरळ येथून मिनी ट्रेन मार्ग प्रबंधक यांच्याकडून प्रवास करण्याची मुभा दिली जाते. ज्यावेळी नेरळ येथून मिनी ट्रेन माथेरानसाठी सकाळी नऊ वाजता जाण्यास निघते, त्यावेळी नेरळ स्थानक येथे असंख्य पर्यटक प्रवासी हे गाडीमधून प्रवास करता यावा आणि माथेरान जाता यावे म्हणून मध्य रेल्वेचे अधिकारी, गाडी चालक, गार्ड यांना विनवणी करीत असतात. मात्र, सर्वसामान्य पर्यटक यांचे नेरळ स्थानक प्रबंधक ऐकत नाहीत. मात्र, त्याचवेळी दर शनिवारी नेरळ स्थानकातून माथेरान येथे विना तिकीट प्रवास करणारे प्रवासी कोण आहेत, ते मध्य रेल्वेचे जावई आहेत काय, असा सवाल आज नेरळ येथे कल्याण येथील प्रवासी श्रावण जाधव यांनी उपस्थित केला. मात्र, त्या प्रवाशाला नेरळ स्थानक प्रबंधक यांनी हुसकावून लावले.

आम्ही दरवर्षी पावसाळ्यात माथेरान येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतो. मात्र, नेरळ येथून आम्हाला प्रवास करता येत नाही. मात्र, आम्ही नेरळ येथून सुटणारी माथेरानला येणारी रिकामी ट्रेन पाहिली तर त्या ट्रेनमधील तीन डब्बे प्रवाशांनी भरलेले होते. माथेरानसाठी निघालेल्या मिनी ट्रेनमधून तब्बल 30 प्रवाशांनी प्रवास केला. तर, मागील प्रत्येक शनिवारी प्रवासी वाहतूक रेल्वे कडून सुरू आहे. त्यामुळे आमच्यासारखे अनेक पर्यटक नाराज असून, पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

तुलसीदास पाटील,
नवी मुंबई पर्यटक

या मार्गावर काम करणारे आमचे रेल्वेचे प्रवासी जात असतात. मात्र, प्रवासी गेले असतील तर ते तपासून घेतो. मात्र, आमचे रेल्वे कर्मचारी यांचे कुटुंबीयदेखील प्रवास करतात, त्याशिवाय त्यांचे नातेवाईकदेखील असतात. परंतु, आम्हालादेखील रेस्ट म्हणून जाण्याचा प्रयत्न असतो.

जितेंद्र भाटी,
उपस्थानक प्रबंधक,
नेरळ रेल्वे स्टेशन

Exit mobile version