| चिरनेर | प्रतिनिधी |
यंदा पावसाळा लवकरच सरला असल्यामुळे नदी, तलाव, ओहळ, शेतातील साठलेले पाणी आदी गोड्या पाण्यातील मासेमारी जोरात सुरू आहे. सध्या गोड्या पाण्यातील विविध मासे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे खवय्यांच्या उड्या आता चविष्ट गोड्या पाण्यातील मासे तसेच गोड्या चिंबोऱ्यांवर पडत आहेत. हे मासे व चिंबोऱ्या सध्या उरण पनवेलच्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने खवय्यांना मेजवानी मिळत आहे. नदीकिनारी ओहळ, शेतात आणि डोंगर कपारीत सापडणाऱ्या गोड्या पाण्यातील विशेषता: काळ्या पाठीच्या चिंबोऱ्या सध्या मुबलक मिळत आहेत. पौष्टिक आणि चविष्ट अशा या चिंबोऱ्या खवय्ये चवीने खातात. तसेच नद्या, तलाव, धरण, पाणवठे, ओढे, ओहळ, शेतात साठलेले पाणी अशा गोड्या पाण्यात सापडणाऱ्या माशांची आवक देखील वाढली आहे. यामध्ये मळे, खवले, कटला, कोलंबी, फंटूस आदी माशांचा समावेश आहे. मळे मासे व खवले मासे हा प्रकार या दिवसात अधिक मिळतो.
त्यामुळे खवय्ये आवर्जून खरेदी करतात. मुंबई, नवी मुंबई येथील ग्राहक देखील उरण पनवेलच्या बाजारात येऊन गोड्या चिंबोऱ्यांसह गोड्या पाण्यातील चविष्ट मासे आवर्जून खरेदी करतात. कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी आणि आगरी समाजातील लोक खूप मेहनतीने हे मासे व चिंबोऱ्या पकडतात. या विक्रीतून त्यांच्या हाती चार पैसे लागतात. शेतातील साठलेले पाणी काढून मासे पकडले जातात. तसेच डोंगरदऱ्यांच्या ओढ्या नाल्यांच्या कपारीतून गोड्या चिंबोऱ्या पकडल्या जातात. साडेतीनशे ते चारशे रुपयांना सहा चिंबोऱ्या विकल्या जातात. गोड माशांचा शंभर रुपये वाटा तर काही गोड्या पाण्यातील मासे शेपाचशेच्या किलोच्या दराप्रमाणे विकले जातात. अशी माहिती विक्रेत्या आदिवासी बांधवांनी दिली.
गोड्या पाण्यातील मासेमारी जोरात
