ओबीसी आरक्षणावर शुक्रवारी निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक
मुंबई | वृत्तसंस्था |
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत सर्व नेत्यांची मते अजमावून घेण्यात आली. केवळ चर्चा झाल्यानंतर पुन्हा शुक्रवारी बैठक घेण्याचे निश्‍चित करून निर्णय पुढे ढकलण्यात आला.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अनिल परब, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. ओबीसी आरक्षणावरील या महत्त्वाच्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे मात्र अनुपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधी ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आलं. येत्या शुक्रवारी पुन्हा यावर चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ओबीसी आरक्षण कायम ठेवून येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी एकमत होऊन त्यावर मार्ग कसा काढता येईल त्यावर चर्चा झाली आहे. येत्या शुक्रवारी पुन्हा यावर चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पटोले यांनी म्हटले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसींसाठी आरक्षण नाही तिथे ते कसे लागू करता येईल यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांमध्ये आरक्षण कायम राहणार असून, 16 जिल्ह्यांमध्ये कमी-जास्तपणा होणार आहे, असे नाना पटोले पुढे म्हणाले.

Exit mobile version