तवसाळ बौद्धवाडीत रात्रीचा भयाण खेळ

भयभीय ग्रामस्थांची गुहानगर पोलीस ठाण्यात तक्रार
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथे रात्रीच्या वेळेस घराचे दरवाजे ठोकणे, घरावर रेती, दगड फेकणे असे अनेक प्रकार गेली अनेक महिने सुरू आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
तवसाळ तांबडवाडीमध्ये रात्रीच्या वेळी घरावर होणारी दगडफेक, रेती पडणे, दरवाजे ठोकणे अशा घटनांमुळे गुढ, भितीमय वातावरण निर्माण झाले आहे. सुरवातीला कोणीतरी त्रास देण्याच्या उद्देशाने हा खेळ करत असेल अशी शक्यता वाटत होती. वाडीतील ग्रामस्थ महिला पुरुषांनी काही दिवस रात्रीच्या वेळेस पहारा ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे उद्योग कोण करतो त्याचा पत्ता लागला नाही. रात्रीचा हा खेळ सतत सुरु झाल्याने लोकांच्या मनात वेगवेगळ्या कुशंका येवू लागल्या आहेत.
परिसरातील पुरूष मंडळी कामानिमित्त मुंबई, पुणे शहरात असल्याने काही घरांमध्ये स्त्रिया एकट्याच राहत असतात. मात्र, घडणार्‍या गुढ प्रकारांमुळे या महिला शेजारी पाजारी रहायला जावू लागल्या आहेत. अशावेळी भिती निर्माण करुन रिकाम्या घरात चोरी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
या घटनांची माहिती तवसाळचे पोलीस पाटील, सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी देण्यात आली आहे. याशिवाय, या भयाण घटनांपासून सुटका होण्यासाठी तवसाळ तांबडवाडीतील 55 महिला पुरुष ग्रामस्थांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

Exit mobile version