। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात वन जमिनी असल्याने अनेक प्रकल्प अनेक वर्षे रेंगाळले आहेत. त्यातील भीमाशंकर घाटरस्त्यासारखा महत्वाचा प्रकल्प रेंगाळला असून आगामी काळात या प्रकल्पासाठी वन विभागाची परवानगी आणली जाईल, असे आश्वासन विद्यमान खासदार बारणे देत आहेत. मात्र, दहा वर्षे या प्रकल्पाचे काम बंद असून खासदारांना त्या दहा वर्षात वेळ मिळाला नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्ग रस्त्यावरील वन जमिनींबाबत कोणतेही धोरण एवढ्या वर्षात स्वीकारण्यात आले नसल्याने खासदारांच्या कार्यपद्धतीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
बारा ज्योतीलिंग पैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे जाण्यासाठी पर्यायी आणि जवळचा मार्ग म्हणून कर्जत तालुक्यातून जाणारा मार्ग तयार करण्याचे शासनाने जाहीर केले होते. 1980च्या रस्ते विकास आराखड्यात भीमाशंकर घाटरस्ता प्रस्तावित होता आणि आज पर्यंत हा रस्ता तयार झालेला नाही. भीमाशंकर अभयारण्य लगतच्या वन जमिनी रस्त्यासाठी दिल्या जात नसल्याने भीमाशंकर राज्यमार्ग रस्ता पूर्ण होऊ शकला नाही. उरण, पनवेल, नेरळ, कशेले, मंचर अशा या राज्यमार्ग रस्त्याचे काम गेली 15 वर्षे अखंडित सुरू असून घाटरस्ता भागातील वन जमिनीमध्ये हा रस्ता आजही अर्धवट आहे.
रायगड जिल्ह्यातील साडेचार किलोमिटर तर पुणे जिल्ह्यातील भाग हा साडेसात किलोमीटर चा आहे. हा वन जमिनीचा भाग वगळता अन्य दोन्ही भागातील रस्ते पूर्ण तयार झाले आहेत. मात्र, वन जमिनीची परवानगी मिळत नसल्याने भीमाशंकर येथे जाण्यासाठी पर्यायी आणि जवळचा मार्ग तयार होऊ शकला नाही. भीमाशंकर घाट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन अर्थमंत्री तटकरे यांच्या हस्ते 2011 मध्ये झाले होते आणि आज एक तप लोटले तरी वन जमिनीची परवानगी मिळविण्यात या भागाचे खासदार यशस्वी ठरले नाहीत. पनवेल येथून पुण्यात हा जवळचा रस्ता असताना देखील आणि वन जमिनीमुळे घाट रस्त्याचे काम रखडलेले असताना देखील विद्यमान खासदार यांच्याकडून दहा वर्षात कोणत्याही हालचाली केल्या गेल्या नाहीत. मात्र, आता सातत्याने त्या रस्त्यावर जनता प्रश्न विचारू लागल्याने खासदार आणि तिसर्यांदा मावळ मधून लोकसभेवर जाण्यासाठी इच्छुक असलेले श्रीरंग बारणे यांनी भीमाशंकर घाट रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन पहिल्यांदा दहा वर्षात दिले आहे.
आणखी पाच वर्षे कशासाठी द्यायची? वन जनिमिमधून रस्ता करण्यासाठी आता दहा वर्षे एकदाही प्रयत्न न करणारे खासदार श्रीरंग बारणे हे आता प्रश्न सोडविणार असल्याची आश्वासने देत आहेत. मात्र, खासदारांना दहा वर्षात हे प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यांना आणखी पाच वर्षे कशासाठी द्यायची, असे प्रश्न शेतकरी कामगार पक्षाने उपस्थित केला आहे.
