। नेरळ । प्रतिनिधी ।
पनवेल येथून येणार्या आणि कर्जत तालुक्यातून पुणे जिल्ह्यात जाणार्या नियोजित राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करावे या मागणीसाठी भीमाशंकर घाटरोड संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. या समितीकडून या विषयाला चालना देण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान, या रस्त्यासाठी गेली अनेक वर्षे आवाज उठवणारी संघर्ष समिती आक्रमक झाली असून या समितीच्या माध्यमातून बैठक रविवारी (दि.9) आयोजित केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत भीमाशंकर घाट रस्ता होणार आहे असे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासून खेड भीमाशंकर आणि त्या परिसरातील लोक आंदोलनेपण करत आहेत. या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नियोजित पनवेल-नेरे-मालडुंगे-नेरळ-कोथिबे-पंढरवादी-भीमाशंकर, राजगुरू नगर हा रस्ता नॅशनल हायवे म्हणून घोषित करावा अशी मागणी केली होत. तद्नंतर ह्या रस्त्याला तत्वतः मान्यता ही मिळाली आहे, परंतु त्यात फॉरेस्ट इको सेन्सिटिव्ह झोन अश्या काही अडचणी असल्याने काम रेंगाळत आहे. हा रस्ता झाल्यास कर्जत तालुक्याच्या विकासाबरोबरच 70 किमीचा वळसाही वाचणार आहे. या रस्त्यासाठी सर्वांचा सहभाग असावा म्हणून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दि.9 जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील कशेळे येथील आंबामता मंदिरात सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन किसनराव गोपाळे आणि सुनील गोगटे यांनी केले आहे.