चिरनेरच्या शेतकर्‍यांना महाबीजकडून

भातखरेदीच्या पैशांची प्रतिक्षा
| चिरनेर | वार्ताहर |
चिरनेर येथील शेतकर्‍यांकडून महाबीजने भात खरेदी केले होते मात्र त्या खरेदी केलेल्या भात खरेदीचे पैसे अद्यापही शेतकर्‍यांना प्राप्त झालेले नाहीत. या परिसरातील शेतकर्‍यांना महाबीज बियाणे उत्पादक कंपनीकडून, ग्रामबिजोत्पादन योजनेअंतर्गत जया या भातपीक वाणाचे पायाभूत बियाणे उपलब्ध करून देण्यात आले होते. दरम्यान हे पीक तयार झाल्यानंतर त्याची हमीभावापेक्षा 20% अधिक दराने खरेदी करण्याचे आश्‍वासन कंपनीकडून देण्यात आले होते. त्यानुसार महाबीज कंपनीच्या कृषी क्षेत्र अधिकारी प्राची मोराळे आणि कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात हमीभावापेक्षा जादा दराने पहिल्या टप्प्यात दहा टन महाबीजच्या पायाभूत बियाण्याची खरेदी करण्यात आली. तर उर्वरित दीड टन भात बियाण्याची खरेदी दुसर्‍या टप्प्यात केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी शेतकर्‍यांना प्रतिक्विंटलला अंदाजे 2473 रुपये किमतीचा भाव देण्यात आला. यात चिरनेर मधील दहा शेतकर्‍यांनी महाबीज कंपनीला आपल्या भात बियाण्याची विक्री केली. शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पैशाची रक्कम जमा होण्यासाठी कंपनीने शेतकर्‍यांकडून आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत प्राप्त करून घेतली. परीणामी दोन दिवसात शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणार असल्याचे महाबीज कंपनीच्या कृषी क्षेत्र अधिकारी प्राची मोराळे यांनी सांगितले होते.मात्र या भात खरेदीला दहा दिवस उलटून जाऊन अजूनही महाबीज कंपनीकडून बँक खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे येथील शेतकरी पैशाची रक्कम जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Exit mobile version