| रत्नागिरी | प्रतिनिधी |
राज्य सरकारने 1 सप्टेंबरपासून घरांच्या परवानग्या पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपात केल्या आहेत. आतापर्यंत रत्नागिरीत 20 परवानगी प्रकरणे दाखल झाली असून, ती निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे घरांसाठी परवानगीला महसूल खाते आणि नगररचना विभागाकडील फेर्या कमी होणार आहेत.
रत्नागिरी येथील नगररचना विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, घराची परवानगी आता केवळ ऑनलाईन स्वरुपात मागावी लागेल. ऑफलाईन स्वरुपात म्हणजे प्रत्यक्ष दस्तऐवज हजर करुन परवानगीचे कामे होणार नाहीत. तसे दस्तऐवज आता स्वीकारले जात नाहीत. लोकांनी पूर्वीप्रमाणेच महसूल खात्यातील सक्षम प्राधिकार्याकडे घर परवानगी मागितली पाहिजे. पण, ती ऑनलाईन स्वरुपात असावी. रत्नागिरी जिल्ह्यात महसूल खात्याकडे सादर झालेले घर परवानगीचे अर्ज अभिप्रायांसाठी नगर रचना विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. अशा अर्जांची संख्या आतापर्यंत 20 वर जाऊन पोहोचली आहे. महसूल खात्यातील आणि नगर रचना विभागातील अधिकार्यांना ऑनलाईन प्रकरणे हाताळणे ही बाब नवीन आहे. दर बुधवारी सकाळी 10 ते 1 या वेळेत नगररचना विभागाचे नागरिकांच्या ऑनलाईन प्रक्रियेवरील समस्या सोडवण्यासाठी आभासी मार्गदर्शन केंद्र चालवले आहे. या केंद्रावर मार्गदर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते. प्रत्येक प्रकरणासंदर्भात मार्गदर्शन देऊ केले गेले तरीही ठरवून दिलेल्या वेळेत सर्व इच्छुक नागरिकांच्या अडीअडची सोडवल्या जाऊ शकत नाहीत. घर परवानगी प्रकरणे 60 दिवसांत निकाली व्हावीत अशी मर्यादा आहे. त्या मर्यादेत निर्णय करावाच लागेल, असे ही प्रशासनाकडून सांगण्यात आले.