उद्योगपतींमध्ये चिंतेचे वातावरण
| पनवेल | प्रतिनिधी |
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या आखाती संघर्षाचे पडसाद आता औद्योगिक क्षेत्रावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगपतींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः फर्नेस ऑइल आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास कारखान्यांच्या उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील तळोजा औद्योगिक क्षेत्र हे नवी मुंबई परिसरातील अत्यंत महत्त्वाचे औद्योगिक केंद्र मानले जाते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या या औद्योगिक वसाहतीत रसायन, औषधनिर्मिती, रंग-रसायने, प्लास्टिक तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील साडेनऊशे लहान मोठे, मध्यम व लघुउद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमध्ये हजारो कामगार व कर्मचारी कार्यरत असून या औद्योगिक क्षेत्राचा स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे.
या औद्योगिक वसाहतीतील अनेक रासायनिक व उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये बॉयलर, औद्योगिक भट्ट्या तसेच उष्णता निर्माण करणाऱ्या विविध प्रक्रियांसाठी फर्नेस ऑइलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फर्नेस ऑइलच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, तळोजा औद्योगिक क्षेत्रातील इंजिनिअरिंग झोनमध्ये धातू प्रक्रिया, फॅब्रिकेशन तसेच औद्योगिक उपकरणांच्या निर्मितीशी संबंधित अनेक कारखाने कार्यरत आहेत. या कारखान्यांमध्ये धातू कटिंग, वेल्डिंग, फॅब्रिकेशन तसेच विविध यांत्रिक प्रक्रियांसाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास या कारखान्यांच्या कामकाजावर व उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक तसेच बाहेरील कामगार कार्यरत असल्याने उत्पादनात घट झाल्यास त्याचा परिणाम रोजगारावरही होऊ शकतो. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी फर्नेस ऑइल व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
कारखान्यांमध्ये फर्नेस ऑइलचा वापर कशासाठी?
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, औषधनिर्मिती, रंग-रसायने, प्लास्टिक व अभियांत्रिकी कारखान्यांमध्ये फर्नेस ऑइलचा वापर विविध औद्योगिक प्रक्रियांसाठी केला जातो.
मुख्य वापर : बॉयलर चालवण्यासाठी - वाफ (डींशरा) तयार करण्यासाठी
भट्ट्या व हीटर्स - उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक उष्णता निर्माण करण्यासाठी
ड्रायिंग प्रक्रिया - रसायन, पावडर किंवा कच्चा माल वाळवण्यासाठी
ऊर्जा निर्मिती - काही औद्योगिक यंत्रणा व प्रक्रियांसाठी उष्णता-ऊर्जा पुरवण्यासाठी इंजिनिअरिंग झोनमधील कारखान्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा वापर कशासाठी?
मुख्य वापर : कटिंग आणि वेल्डिंग - लोखंड, स्टील व इतर धातू कापणे व जोडण्यासाठी मेटल फॅब्रिकेशन - यंत्रसामग्रीचे भाग व धातूचे स्ट्रक्चर तयार करण्यासाठी हीट ट्रीटमेंट प्रक्रिया - धातू किंवा घटकांना उष्णता देऊन मजबुती वाढवण्यासाठी औद्योगिक भट्ट्या - लहान भट्ट्या किंवा हीटिंग यंत्रणा चालवण्यासाठी
इंजिनियरिंग झोनमधील कारखान्याना व्यावसायिक सिलेंडरची आवश्यकता असते. सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने इंजिनियरिंग झोन मधील कारखान्यानंमधील कामावर परिणाम होत आहे.
सतीश शेट्टी,
अध्यक्ष
तळोजा इंडस्ट्रिअल असोशियन
कारखान्यातील उत्पादन क्षमतेवर अद्याप तरी परिणाम झालेला नाही. मात्र, युद्ध सुरु राहिल्यास परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
शेखर श्रींगारे,
अध्यक्ष
टी एम ए





