। मुंबई । प्रतिनिधी।
हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाला 37 वर्षांनंतर अटक करण्यात आझाद मैदान पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपी मोबाइलचे नेटवर्क नसलेल्या डोंगराळ भागात लपून बसला होता. पण पोलिसांनी शोध घेणे सोडले नाही. अखेर कोणतीही ठोस माहिती नसताना आझाद मैदान पोलिसांच्या तडीपार कक्षाने आरोपीला अटक केली.
मंगेश गोविंद मोरे ऊर्फ मंगेश मांजरेकर असे अटक आरोपीचे नाव आहे. तो डोंबिवलीतील शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी होता. मुंबईतील एका अधिकार्याने सांगितले की, 37 वर्षांपूर्वीच्या खूनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात तो फरारी होता. 1988 पासून पोलिसांचा चकवा देत आरोपी लपून होता. कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती नव्हती. केवळ आरोपीचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रानवड येथील असल्याची माहिती होती.
आरोपीने 37 वर्षांपासून त्याचे घरदार सोडले होते. नातेवाईकांशीही संपर्क तोडला होता. त्यामुळे त्याच्याबाबत कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागली नव्हती. फक्त आरोपीचे मूळ गाव महाड तालुक्यातील रानवड येथील असल्याची माहिती पोलिसांना होती. त्याच माहितीच्या आधारे पोलीस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. पण आरोपी तेथेही येत नसल्याचे दिसून आले. अखेर आरोपी गावापासून 15 किलोमीटर अंतरावर वाकी बुद्रुक येतील नाणेमाची येथे वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली. हे गाव डोंगराळ भागात असून तिथे पोहोचण्यासाठी योग्य रस्ता नाही. तसेच, त्या भागात मोबाइल नेटवर्कही व्यवस्थित नाही. अशा परिस्थितीत पोलीस पथकाने त्या ठिकाणी पोहचून आरोपीला अटक केली. मांजरेकर 1988 मध्ये दक्षिण मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात फरारी होता आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्याच्यावर आधीपासूनच इतर गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत.