माणगावात तीनही विकसनशील प्रकल्पाच्या भूसंपादनाचे तीनतेरा
माणगाव | वार्ताहर |
माणगावात तीनही महत्त्वाचे विकसनशील प्रकल्पाचे काम सुरु असून, या विकसनशील प्रकल्पाला शेतकर्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात संपादित करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या प्रकल्पात जाणार्या जमिनीचा मोबदला शेतकर्यांना वेळेवर मिळत नसल्याने माणगावात तीनही विकसनशील प्रकल्पांच्या भूसंपादनाचे तीनतेराच वाजले आहेत. शासनाकडून बाधित शेतकर्यांना मोबदला देण्यासाठी निधीच मिळत नसल्याने या प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागत आहे.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमुळे माणगाव जरी जगाच्या नकाशावर पोहोचला असला, तरी तिसर्या नव्या मुंबईमुळे माणगाव तालुक्याला अधिक वैभव प्राप्त झाले आहे. त्यामुळे माणगावच्या औद्योगिकीकरणात भर पडली ती लोहमार्ग, सागरीमार्ग आणि महामार्गाची, त्यामुळे माणगाव तालुक्याला अनन्य महत्त्व प्राप्त झाले आहे. या वाढत्या नागरीकरणाबरोबरच शहरीकरणही झपाट्याने वाढत आहे. पर्यायाने माणगाव तालुक्याचा विकासही तितक्याच जलद गतीने होत आहे. त्यामुळे माणगाव तालुका हा आर्थिक उलाढालीचे केंद्र बनत आहे. वाढत्या औद्योगिकीकरणाच्या दळणवळणात भर घातली ती कॉरीडोर, लोहमार्ग, महामार्ग, त्यामुळे माणगावचे उज्ज्वल भविष्य ठरविणारा काळ काही अंतरावर येऊन ठेपला असून, येथील जमिनीलाच काय, दगडालाही सोन्यापेक्षा मोठी किंमत आली आहे. त्यामुळे माणगाव तालुक्याच्या विकासाचा वाढता आर्थिक आलेख दरडोई वाढत चालला आहे. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर माणगांव वसलेले असून या तालुक्याची लोकसंख्या सुमारे 1 लाख 55 हजाराहून अधिक आहे. तालुक्यात 187 गावे व 74 ग्रामपंचायतींचा समावेश होता. 1983 मध्ये विळे भागाड औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यानंतर मोठमोठ्या देशी-विदेशी कंपन्यांनी या ठिकठिकाणी प्रकल्पासाठी काम सुरू केले आहे. याव्यतिरिक्त कॉरीडॉर अंतर्गत माणगाव, रोहा, वावेदिवाळी, पळसगाव हे नव्याने औद्योगिक क्षेत्र शासनाने घोषित केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची प्रक्रिया झपाट्याने सुरु आहे.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर
माणगाव तालुक्यातील 22 गावातील 5000 हेक्टर क्षेत्रापैकी 3519 हेक्टरच्या क्षेत्राचे जमीन मोबदला करण्यात आले असून, 1403 हेक्टर क्षेत्रातील मोबदला वाटप करणे बाकी आहे. यासाठी सुमारे 150 कोटी रुपये शासनाकडून येणे आपेक्षित आहेत. मात्र, दोन महिन्यांपासून निधी आला नसल्याने भूसंपादनाचे काम रखडले आहे.
रेल्वेचे दुहेरीकरण
दुसरा प्रकल्प रेल्वे दुहेरीकरण रोहा ते वीर हे 47 कि.मी. अंतर असून, माणगाव तालुक्यातील 16 गावांतील जमिनीचे क्षेत्र संपादित करण्याची प्रक्रिया अपूर्ण आहे. रेल्वे दुहेरी प्रकल्पासाठी जमिनी संपादनाची प्रक्रिया अवघड असल्याने व अनेक तांत्रिक बाबीमुळे ती मंदगतीने चालू आहे.
मुंबई-गोवा महामार्ग
मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रकल्पाचे भूसंपादनाचे काम धीम्या गतीने सुरु असून, यामध्ये 26 गावांतील 106 हेक्टर जमिनीचे क्षेत्र असून, त्यापैकी 103 हेक्टर जमिनीचे क्षेत्र संपादित झाले आहे. उर्वरित क्षेत्र संपादित करणे बाकी असून, बाधित शेतकर्यांना निधी मिळणे बाकी आहे. त्यामुळे शेतकर्योना मोबदल्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. या तीनही प्रकल्पाला निधीचा ब्रेक लागला आहे.