महामार्गावरील पथदिव्यांसाठी निधी

| पनवेल । वार्ताहर ।
खारघर सायन-पनवेल महामार्गावरील खारघर ते कळंबोली मार्गावरील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद असल्याने महामार्गावर अंधाराचे जाळे आहे. त्यामुळे या मार्गावरली प्रवास धोक्याचा झाला आहे. पथदिवे देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने देण्याची मागणी पनवेल पालिकेने केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने पालिकेला आठ कोटींचा निधी हस्तांतर केला असून या मार्गाला लवकरच झळाळी प्राप्त होणार आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. निधीअभावी महामार्गावरील पथदिवे त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा देखभाल-दुरुस्त करणे सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरापास्त झालेहोते. अंधारामुळे योग्य अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडल्याने प्रवासी वर्गात नाराजी होती. महामार्गावरील पथदिवे देखभाल व दुरुस्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावेत, अशा प्रकारचे आदेश सरकारकडून निर्गमित करण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार करून पथदिवे स्थानिक स्वराज्य संस्थांना हस्तांतरीत करण्याची विनंती केली होती.

मात्र पनवेल महापालिकेने सीबीडी भारती विद्यापीठ ते कळंबोली जंक्शन यादरम्यानचे पथदिवे देखभाल- दुरुस्तीसाठी लागणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा, असे पत्र दिले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने पालिकेला आठ कोटींचा निधी हस्तांतर केला असून बंद पथदिव्यांच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात होणार आहे.

Exit mobile version