| नवीन पनवेल । वार्ताहर ।
खारघर आणि तळोजा वसाहतीमधील मुख्य रस्ता आणि अंतर्गत पदपथ आणि रस्ता दुभाजकावर बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सावात होणारी गैरसोय टळल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
खारघर आणि तळोजा वसाहतीत बांधकाम व्यावसायिकांकडून तसेच विविध एजन्सीकडून खोदकाम करून केबल वाहिन्या टाकण्यात येत आहेत. या कामांमुळे वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, पदपथ आणि रस्ता दुभाजकावर असलेल्या पथदिव्यांच्या केबलवाहिन्यांना हानी पोहचत असल्यामुळे बिघाड होऊन पथदिवे बंद पडतात. खारघर आणि तळोजा परिसरात मुख्य आणि वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे बंद आहेत. अशातच सार्वजनिक आणि घरोघरी गणेशाचे आगमन होणार असल्याने गणेशभक्तांना सणासुदीत विविध अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली होती. पण सिडकोच्या विद्युत विभागाने गेल्या तीन दिवसांपासून खारघर आणि तळोजा वसाहतीमधील बंद असलेले पथदिवे सुरू करण्याचे काम हाती घेतले असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
तळोजा वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होते. सिडकोकडून ते गणेशोत्सवापूर्वी सुरू केले जात आहेत. गणेशभक्तांसाठी ही समाधानाची बाब आहे.
बबन केणी