कामे आराखड्यानुसार नसतानाही बिले मंजूर
। पाली- गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील गोमाशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 15 वित्त आयोग निधीचा वापर येथील प्राथमिक शाळेचे शौचालय दुरुस्ती आणि संरक्षण भिंत बांधण्यासाठी करण्यात आला. परंतु, आराखड्याप्रमाणे कामे झाली नसल्यामुळे गुरुवारी (दि.17) गटविकास अधिकारी सुधागड यांना लेखी निवेदन देऊन संबंधित ठेकेदार, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व विभागिय अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गोमाशी ग्रामपंचायतीने या निधीचा वापर येथील राजिप प्राथमिक शाळेच्या कामासाठी वापर केला आहे. त्याची माहिती घेण्यासाठी भुषण सुतार यांनी 10 मार्च रोजी ग्रामपंचायतीवर माहितीचा अधिकार टाकला. त्याअंतर्गत माहिती समोर आली त्यातील आराखड्यानुसार दोन्ही कामे झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यात प्रत्यक्षात संरक्षण भिंतीच्या कामाचा आराखडा आहे. मात्र, तारेच्या कंपाऊंडचा आराखडा नसतांना देखील ठेकेदारांनी काम कोणत्या आराखड्यानुसार पूर्ण केले? तसेच, ग्रामपंचातीने माहिती अधिकारात दिलेल्या शौचालय दुरुस्ती आराखड्याप्रमाणे प्रत्यक्षात काम झाले की नाही, ते न बघताच काम पूर्णचे मूल्यांकन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. एवढे होऊनही ग्रामपंचायत अधिकार्यांनी काम पूर्ण होण्याआधीच बिल अदा केले आहे. ही दोन्ही कामे ठेकेदार हरिदास गायकवाड यांनी आराखड्यानुसार केली आहेत की नाही, हे पाहणे सरपंच मंगल जाधव, ग्रामपंचायत अधिकारी वर्षा डाके आणि विभागीय अभियंता जी.आर. देशमुख यांची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनातून केली आहे.
ग्रामपंचायतीचा अजब कारभार
माहिती अधिकारा अंतर्गत ग्रामपंचायतीने दिलेल्या आराखड्याप्रमाणे काम केले नसतानाही संरक्षण भिंतीचे दि.12 नोव्हेंबर, 2024 रोजीचे तर शालेय शौचालय दुरुस्तीचे दि.14 जानेवारी रोजीचे विभागीय अभियंताचे काम पूर्ण केलेले मूल्यांकन प्रमाणपत्र अदा करण्यात आले आहे. तसेच, ग्रामपंचायत अधिकार्यांनी काम पूर्ण नसताना देखील बिल अदा केलेल्या सामान्य रोकड वहीतील नोंदीनुसार संरक्षण भिंत 15 जानेवारी रोजी रक्कम 1 लाख 31 हजार 202 रुपये तर 3 फेब्रवारी रोजी शौचालय दुरुस्ती रक्कम 45 हजार 251 रक्कम अदा करण्यात आली आहे.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी वर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
लता मोहिते,
गटविकास अधिकारी, सुधागड