Primary Health Centre: जोहे आरोग्य केंद्राच्या निधीला कात्री

मंजूर प्रस्तावाचे श्रेय लाटण्यावरून सभागृहात रणकंदन; भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील जोहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निधीवरून जिल्हा परिषदेत सत्ताधारी गटातीलच पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पाच वर्षांपूर्वी दिवंगत माजी कृषी सभापती प्रमोद ऊर्फ ‌‘पिंट्याशेठ’ पाटील यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या आरोग्य केंद्राच्या प्रस्तावातील निधीत कपात करून त्याचे श्रेय विद्यमान कृषी सभापती वैकुंठ पाटील लाटत असल्याचा गंभीर आरोप पेण पंचायत समितीच्या सभापती स्मिता पाटील यांनी केला.

जोहे ग्रामपंचायतीच्या अखत्यारित जोहे, तांबडशेत, हनुमान पाडा आणि डावरा या गावांचा समावेश असून, या परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जोहे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. ग्रामपंचायतीने आरोग्य केंद्रासाठी जागाही उपलब्ध करून दिली होती. सुमारे 2 कोटी 30 लाख रुपयांचा निधी पाच वर्षांपूर्वीच मंजूर झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

मात्र, प्रमोद पाटील यांच्या निधनानंतर हा प्रकल्प रखडला. दरम्यान, विद्यमान कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी आरोग्य केंद्राचा प्रस्ताव आपणच आणल्याचा दावा केल्याचा आरोप स्मिता पाटील यांनी केला. एवढेच नव्हे, तर पूर्वी मंजूर असलेल्या निधीत कपात करून तो सुमारे 1 कोटी 30 लाख रुपयांपर्यंत आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

याच मुद्द्यावर सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वैकुंठ पाटील आणि स्मिता पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. मंजुरीआधीच झालेली असताना नव्याने श्रेय घेण्याचा प्रयत्न का केला जात आहे आणि मंजूर निधीत कपात का करण्यात आली, असा सवाल स्मिता पाटील यांनी उपस्थित केला.
‌‘पिंट्याशेठ’च्या पुढाकाराने मंजूर झालेल्या कामाचे श्रेय दुसऱ्याने घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत स्मिता पाटील यांनी सभागृहातच या प्रकाराचा समाचार घेतला. त्युाळे जोहे आरोग्य केंद्राचा प्रश्न आता केवळ निधीपुरता न राहता श्रेयवादाच्या राजकारणामुळेही चर्चेत आला आहे.



जोहे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी माझे पती दिवंगत प्रमोद पाटील (पिंट्याशेठ) सभापती असताना अडीच कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मंजूर झाला होता. तो प्रस्ताव बदलून विद्यमान कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी 1 कोटी 30 लाख इतका केला. या ठरावाला माझा विरोध असून, त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्मिता पाटील,
सभापती, पेण पंचायत समिती
Exit mobile version