| तळा | प्रतिनिधी |
विज्ञान म्हणजे कुतूहल, प्रयोगशीलता आणि नवसर्जनाचा संगम आणि हाच संगम अनुभवायला मिळाला तो गो. म. वेदक विद्यामंदिर आणि कला- वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, तळा येथे आयोजित शालेय स्तर विज्ञान प्रदर्शनात. या भव्य प्रदर्शनाने विद्यार्थ्यांची वैज्ञानिक जिज्ञासा, तांत्रिक कौशल्य आणि नवोन्मेषी वृत्तीचा अप्रतिम आविष्कार घडवून आणला. विज्ञान प्रदर्शनाच्या प्रतिकृती दालनाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के आणि महादेव बैकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव मंगेश देशमुख यांनी भूषविले.
याप्रसंगी प्राचार्य दिलीप ढाकणे, महादेव लोकरे, विनायक महाडकर, प्रा भुरे टी. एन. जयश्री मचे, प्रा शिंदे बी. डी., प्रा जमादार एस. टी., प्रा वाडीकर के. जे., प्रा पाटील एन. सी., प्रा कुळकर्णी बी एस आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. परीक्षक म्हणून रूपा सप्रे आणि काकासाहेब पवार यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रमुख प्रतिकृतींपैकी वॉटर डिस्पेन्सर, मच्छर नाशक अगरबत्ती, ठिबक सिंचन प्रणाली, पक्कड यंत्र, कृत्रिम दंतमंजन, त्रिमितीय प्रतिमा, प्रदूषित वायू निरसन, पिण्याचे पाणी शुद्धीकरण मॉडेल, सौरमाला, ज्वालामुखीचा उद्रेक, पाण्याचे चक्र, रक्ताभिसरण तंत्र, हरितगृह परिणाम, प्रदूषण नियंत्रण, स्मार्ट सिंचन, पवनचक्की, जलविद्युत निर्मिती, सौरऊर्जेचे घर, चुंबकत्व प्रयोग, विद्युत परिपथ, प्रदूषणमुक्त शहर, हवामान बदल मॉडेल, स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम, ध्वनीतरंग, अवकाश प्रक्षेपण केंद्र, जलशुद्धीकरण संयंत्र, कृत्रिम पाऊस, पृथ्वीचे अंतर्गत स्तर, वायू प्रदूषण उपाय योजना, स्मार्ट शेती, आपत्कालीन ऊर्जा निर्मिती अशा अनेक उत्कृष्ट संकल्पनांचा समावेश होता. विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रतिकृती, निबंध, वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, पालक, गो म वेदक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.







