शाळा, अंगणवाड्यामध्ये जि.प.ची नळ जोडणी

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात जलजीवनच्या पाणी योजना धिम्यागतीने सुरु आहेत. असेअसलेतरी याचा योजनेच्या आधारे जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांची पाणी समस्या जिल्हा परिषदेने निकाली काढली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सर्व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. नळ जोडणी अभावी पाणी पुरवठा होत नसलेल्या शाळा आणि अंगणवाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली आहे.

शाळा, अंगणवाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नळ जोडणी जोडण्याची मोहीम रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन योजनेअंतर्गत हाती घेतली आहे. रायगड जिल्ह्यात 3 हजार 158 शाळा असून, 22 मार्चपर्यंत 99.43 टक्के म्हणजे 3 हजार 140 शाळांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर 3 हजार 53 अंगणवाड्या असून, आत्तापर्यंत 98.89 टक्के म्हणजे 3 हजार 29 अंगणवाड्यांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उर्वरित 18 शाळा व 34 अंगणवाड्यांना त्वरित नळ कनेक्शन जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शाळा व अंगणवाडी इमारतींना नळ कनेक्शन जोडण्याची मोहीम जलजीवन योजनेतंर्गत हाती घेण्यात आली आहे. शाळा व अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. उर्वरित नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही सुरू असून, या कामाचा आढावा घेण्यात येत आहे. पुढील काही दिवसात जिल्ह्यातील 100 टक्के शाळा व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल.

डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड
Exit mobile version