वळवली येथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध
| अलिबाग | प्रमोद जाधव |
कर्मचाऱ्यांच्या निवासी संकुलासाठी वळवलीमधील गुरचरण जागेवर उसर येथील गेल कंपनीचा डोळा आहे. याबाबत बेलोशी ग्रामपंचायतीकडे जागेच्या मागणीसाठी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येते. सदरची जागा देण्यास ग्रामस्थांनी नकार देत संकुलाला तीव्र विरोध केला आहे. याबाबत ग्रामपंचायतीसह तहसील, उपविभागीय व जिल्हाधिकारी कार्यालयाला ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. यातून मार्ग न निघाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
अलिबाग तालुक्यातील वळवली येथील गावाशेजारी सर्वे नं. 75 व सर्वे नं. 82 ही जागा गुरे चारण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. 13.61 हेक्टर क्षेत्रातल्या या जागेवर शेतकऱ्यांची गुरे चरत आहेत. गुरांना चरण्यासाठी मुबलक जागा मिळावी यासाठी ही जागा वळवलीसह परिसरातील गुरांसाठी फायदेशीर ठरत आहेत. येथील हिरवा चारा गाय, म्हैस, बैल आदी पाळीव जनावरे खात असतात. या जागेचा वापर शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी होत आहे. चाऱ्याअभावी गुरांची उपासमार होण्याचा धोका अधिक आहे. तसेच उन्हाळ्यात या जागेमध्ये बैलगाडी शर्यतीबरोबरच क्रिकेटच्या स्पर्धादेखील भरविल्या जात आहे. त्याचा फायदा आजूबाजूच्या गावांनादेखील होत आहे. मात्र, या जागेवर उसर येथील गेल कंपनीचा डोळा असल्याचे समोर आले आहे. गेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना निवासी संकुल उभारणीसाठी या जमिनीच्या नाहरकत दाखल्याची मागणी कंपनीचे महाप्रबंधक जितिन सक्सेना यांनी त्यांच्या सहीनीशी 3 ऑगस्ट रोजी लेखी पत्राद्वारे बेलोशी ग्रामपंचायतीकडे केली. या जागेपर्यंत येण्या जाण्यासाठी रस्ते व अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी 20 मीटर रुंद रस्त्याची आवश्यकता आहे. त्यासाठी 2.25 हेक्टर जागेची गरज असल्याचे नमूद केले आहे. याबाबतची माहिती वळवली येथील ग्रामस्थांना समजताच त्यांनी ही जागा गेल कंपनीच्या प्रस्तावित रहिवासी वसाहतीसाठी देण्यास विरोध केला आहे. रस्त्यासाठी जागा लागणार असल्याने आजूबाजूला आदिवासी समाजाची घरे असून, ही घरे व त्यांची जागादेखील जाण्याची भीती व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून गुरे चरण्यासाठी जागा आरक्षित आहे. या जागेवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल बांधण्याचा घाट कंपनीने घातला आहे. त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे. शेतकऱ्यांसह गुरांचे प्रचंड नुकसान होणार आहे. शेती व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे ही जागा संकुलासाठी देण्यात येऊ नये. या जागेबाबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे गेल कंपनीला उपलब्ध करू नये. अन्यथा कंपनी व त्यांच्या प्रस्तावित कर्मचारी रहिवासी वसाहतीविरेोधात आम्हा शेतकऱ्यांद्वारे तीव्र लढा उभारला जाईल.
जगदीश पाटील, ग्रामस्थ
वळवली येथील गुरचरण जागेची मागणी कर्मचारी वसाहतीसाठी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामसभा घेण्यात आली होती. ग्रामस्थांनी जमीन देण्यास नकार दिला आहे. त्याबाबत सभेत ठराव घेतला असून, कंपनीलादेखील तसे तोंडी कळविण्यात आले आहे.
शैलेश नाईक, ग्रामविकास अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत बेलोशी
कर्मचारी वसाहतीसाठी वळवली येथील जमिनीची गरज आहे. बेलोशी ग्रामपंचायतीकडे जागेसाठी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. अद्यापर्यंत लेखी पत्र आलेले नाही.
जितीन सक्सेना, महाप्रबंधक, गेल इंडिया लिमिटेड उसर-अलिबाग
कंपनीने वळवली येथील गुरचरण जागेच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीकडून नाहरकत दाखला मागितला आहे. याबाबत ग्रामस्थांची बैठक घेतली असता, जमिन देण्यास त्यांनी विरोध केला आहे. ग्रामस्थांच्या पाठीशी कायम सोबत आहोत
श्रीधर भोपी, माजी पंचायत समिती सदस्य, अलिबाग पंचायत समिती