प्रकल्पग्रस्त अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत

सहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून भुमिका घेण्यास टाळाटाळ

| अलिबाग | प्रतिनिधी |

गेल कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात संंयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीच्यावतीने गेल कंपनीसमोर उसर येथे साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. आपल्या न्याय हक्कासाठी गेल्या सहा दिवसांपासून हा लढा सुरु करण्यात आला आहे. मात्र आजपर्यंत कंपनी प्रशासनाबरोबरच जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक भुमिका घेतली नसल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत शेतकरी, प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रकल्पग्रस्तांना गेल कंपनीत कायम स्वरुपी नोकरी देण्याचा लेखी करार करावा, प्रकल्पासाठी संपादीत झालेल्या जमीनींचे 15 टक्के विकसीत जमीन प्रकल्पग्रस्तांना द्यावी. सर्व प्रकल्पग्रस्तांना त्वरित प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा. 247 शेतकऱ्यांच्या वारसांना कंपनीमध्ये सामावून घ्यावे. प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना प्राधान्याने नोकरी द्या. त्यानंतर परिसरातील गावांमधील तरुणांना नोकरी द्या. ज्या प्रकल्पग्रस्तांचे वारस नाहीत, त्या प्रकल्पग्रस्तांना शेवटपर्यंत वेतन द्या.प्रकल्पासाठी लागणारा माल वितरीत करण्यासाठी प्रकल्पग्रस्त, स्थानिकांना प्राधान्य द्या.

दरवर्षी 20 प्रकल्पग्रस्तांना कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घ्यावे. कंपनीतील सीएसआर निधीचा वापर उसर, घोटवडे, कुणे, नाईक कुणे, कंटक कुणे, मल्याण येथील गावांतील प्रकल्पग्रस्तांबरोबर अन्य गावांत पाणी, रस्त्याची कामे करण्यासाठी करावा. भ्रष्टाचार रोखण्यासाठी कंपनीमार्फतच ही कामे करण्यात यावी, अशा अनेक मागण्यांसाठी 15 सप्टेंबरपासून शेतकरी, प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण सुुरू केले आहे. नीलेश गायकर, निखील पाटील, योगेश गुजर यांच्या पुढाकाराने हा लढा सुरु केला आहे. या लढ्याला सहा दिवस उलटून गेले आहेत.

Exit mobile version