पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारा भोंदूबाबा गजाआड

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यात अनेक वर्षे भोळयाभाबडया लोकांना अंधश्रध्दा, रियल इस्टेट खरेदी विक्री, कमी किंमतीत सोने तसेच नरबळी वगैरे भुलथापांद्वारे गंडविणाऱ्या भोंदूबाबा काकामहाराज उर्फ पंढरीनाथ गणपती पवार याला पैशाचा पाऊस आणि हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून  36 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा पोलीसांनी 24 तासात पोलादपूर तालुक्यातून मुसक्या बांधून नेल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. आरोपीची पत्नी एका राजकीय पक्षाची तालुका पदाधिकारी असल्याने त्याचे आरोपीचे अनेक बडया राजकीय व्यक्तींसोबत सौहार्दपूर्ण संबंध असल्याची चर्चाही या अटकेच्या निमित्ताने तालुक्यात सर्वत्र होऊ लागली आहे.

पत्नी राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याने हा ‘काका महाराज’ या टोपणनावाने सातारा जिल्ह्यात वावरणारा भोंदूबाबा नेहमीच भोळयाभाबडया तसेच हव्यासी लोकांना ठकवून लाखो रूपयांना गंडा घालत असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून पोलादपूर तालुक्यात सर्वत्र होत असे. मात्र, कितीही किस्से चर्चेत आले तरी भोंदूबाबा काकामहाराज उर्फ पंढरीनाथ गणपती पवार याला पोलीसांच्या खाकी वर्दीचा हिसका पाहावा लागला नसल्याचीही प्रौढी तालुक्यातील जनतेत काकामहाराजांच्या अनेक अनुयायांकडून होत असे.

सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका तक्रारदाराला भोंदूबाबा काकामहाराज उर्फ पंढरीनाथ गणपती पवार याने अघोरी पूजा, जादूटोणा, चमत्कार व टोटक्याच्या वस्तुंच्या विक्रीतून पैशाचा पाऊस आणि हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात 36 लाखांना गंडा घातला, असल्याची तक्रार 25 जून 2024 रोजी तक्रारदाराने पोलीस ठाण्यात दाखल केली. यावेळी तक्रारीच्या अनुषंगाने सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र म्हस्के यांनी सूचना दिल्यानुसार सातारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रायगड जिल्ह्यातील काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसोशीने तपासणी करून मिळविलेल्या माहिती आधारे आरोपीला पोलादपूर येथून ताब्यात घेतले. यावेळी आरोपीने काही साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले असल्याची माहिती तपासिक अंमलदार सहायक पोलीस निरिक्षक मते यांनी दिली.

पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस निरिक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले आदींनी या कारवाईत सहभाग घेत आरोपीच्या मुसक्या 24 तासांमध्ये आवळल्या असून याप्रकरणी अधिकाधिक आरोपी असण्याची शक्यता लक्षात घेऊन भोंदूबाबा याच्यासोबत कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा तपास घेऊन सातारा पोलीस पुन्हा पोलादपूर तालुक्यात येण्याची शक्यता व्यक्त झाल्याने पोलादपूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रासह, अंधश्रध्दा पसरविणाऱ्या व्यक्ती तसेच रियल इस्टेट व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Exit mobile version