| पोलादपूर | वार्ताहर |
पोलादपूर तालुक्यात इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राच्या व्हिव्हिपॅट मशीनद्वारे मतदारांमध्ये जनजागृती सुरू झाली असून तहसिलदार कपिल घोरपडे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 3 जानेवारी 2024 रोजी शुभारंभ करण्यात आला.
मतदारांमध्ये इव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशीनबाबत अनेक गैरसमज पसरविण्यात आले असून इव्हिएमच्या सत्यतेबाबतही साशंकता घेतली जात असल्याने निवडणूक आयोगाने मतदान केल्यानंतरची पोचपावती देण्यासाठी व्हिव्हिपॅट मशीन जोडून खात्री पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलादपूर तालुक्यात या निवडणूक यंत्रणेच्या सत्यतेबाबत जनजागृती करण्याची मोहिम सुरू करण्यात आली असून या जनजागृतीच्या रथाला जीओटॅग करण्यात आल्यामुळे ज्या गावामध्ये जनजागृती त्या गावात हा रथ पोहोचला आहे अथवा नाही याबाबत प्रशासनाची खात्री पटणार आहे, अशी माहिती तहसिलदार कपिल घोरपडे यांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.
याप्रसंगी तहसिलदार कपिल घोरपडे यांच्यासह निवडणूक शाखेचे कर्मचारी, पोलादपूर तहसिल कार्यालयामधील स्टाफ व तलाठी आणि सेतूचे कर्मचारी आदी उपस्थित होते.