गजानन भोईर यांचे उपोषण मागे

। हमरापूर । प्रतिनिधी ।

पेण तालुक्यातील आपल्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन भोईर यांनी पेण येथील खारभूमी खात्याच्या कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण लेखी दिलेल्या पत्रानंतर मागे घेण्यात आले आहे.

कोलेटी, आमटेम भागातील खारभूमी योजनेच्या कामाबद्दल ग्रामस्थ सतत तक्रारी करत आहेत. त्यात अनेक त्रुटी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, त्याकडे अधिकार्‍यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे गजानन भोईर हे (दि.18) जून रोजी आमरण उपोषणास बसणार होते. परंतु, तहसीलदार तानाजी शेजवळ यांनी त्यांना उपोषणास न बसण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन गजानन भोईर यांनी आपलं आमरण उपोषण स्थगीत केले होते. मात्र 20 दिवस होऊन देखील याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे भोईर व ग्रामस्थांनी पेण येथील खारभूमी खात्याच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केल होते.

यावेळी अरुण शिवकर, नंदा म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, अभि म्हात्रे तसेच उपोषण करते गजानन भोईर व उपअभियंता अतुल भोईर यांच्यात यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करून येत्या 5 जुलै रोजी एक संयुक्त बैठक घेतली जाईल. या बैठकीला खारभूमी, वनखाते तसेच इतर खात्याच्या अधिकारांची एक बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे उपअभियंता अतुल भोईर यांनी सांगितले व गजानन भोईर यांनी आपले उपोषण तूर्तास मागे घ्यावे, अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत गजानन भोई यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

Exit mobile version