कर्जत येथे जुगार अड्ड्यावर धाड; लाखाेंचा मुद्देमाल जप्त

सात गाड्यांसह 26 जण ताब्यात

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरातील नानामास्तर नगर भागातील कुकूज फार्म हाऊस येथे पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांनी तब्बल 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून जुगार खेळणाऱ्या 26 जणांना ताब्यात घेतले आहे. जुगार खेळण्यासाठी महागड्या गाडया घेवून मुंबई, पुणे आणि गुजरात येथून जुगारी आले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी (दि.4) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कुकूज फार्म हाऊस येथे प्रवेश केला. केट्रा, वेगनार , स्विफ्ट, आय टेन अशा सात महागड्या तेथे आढळून आल्या. यावेळी फार्म हाऊसमधील खोल्यांमध्ये 26 व्यक्ती पत्त्यांचा जुगार खेळत होते. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा चार बाकड्यांवर जुगार खेळला जात होता. पहिल्या बाकड्यावर  1 लाख 12 हजार, दुसऱ्या बाकड्यावर 96 हजार 100,  तिसऱ्या बाकड्यावर  96 हजार 400 आणि चौथ्या बाकड्यावर 58 हजार 600 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. जुगार खेळत असलेल्या 12 व्यक्तींकडून पोलिसांनी 9 लाख 18 हजार रुपयांची रोकड जप्त केली.

जुगार खेळण्यासाठी आलेल्या व्यक्तींमध्ये गुजरात राज्यातील तसेच मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण आणि कर्जत या भागातील व्यक्ती होते. या 26 व्यक्तींवर कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला उप निरीक्षक गावडे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version