| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर शहरातील भरवस्तीतील एका इमारतीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली. मुद्देमालासह दोनजणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्यामधून देण्यात आली. धाडीमध्ये सापडलेल्या दोन पावती पुस्तकांपैकी एका डायरीवर इंग्रजीमधील के अक्षर दिसून आल्याने हा कल्याण मटका असल्याची खात्री पटल्याने आरोपींविरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम 1887 कलम 12 अ प्रमाणे कारवाई करून ताब्यात घेतले आहे.
शिवाजीनगर मटनमार्केट परिसरामध्ये महाडचे सहायक पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी धाड घालून 21 हजार 500 रूपयांचे रोख रक्कम, दोन मोबाईल,सोमनाथ जाधव नांव लिहिलेली हिरव्या रंगाची डायरी, इंग्रजी के अक्षर छापलेले पावतीपुस्तक, कार्बन पेपर आणि जुना वापरता पेन असा एकूण 31 हजार 505 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. कल्याण नावाचा जुगार चालविल्याबद्दल सोमनाथ दिलीप जाधव आणि हुकूमचंद शेडगे या दोघांना ताब्यात घेतले आहे.