। पनवेल । वार्ताहर ।
T-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील फायनल स्पर्धेवर बेकायदेशीर पैश्यांचा जुगार खेळणार्यांवर गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने छापा टाकत अटक केली आहे. खारघरमधील केसर बिल्डिंग न.04 येथे रु न. 702 या ठिकाणी सध्या सुरू असलेल्या टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील फायनल स्पर्धेवर बेकायदेशीर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 3 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व अंमलदार यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी निलेश रामरखयानी (वय 33 वर्षे), सुनिल मखिजा (वय 43 वर्षे), सतिश लोखंडे (वय 34 वर्षे) आणि जयकुमार कुकरेजा (वय 37 वर्षे) यांनी आपापसात संगनमत करुन लोकांची फसवणूक करण्याचे उद्देशाने व स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता विविध वेबसाईट तसेच अँपमधून क्रिकेट मॅचच्या हारजीतवर मोबाईल द्वारे व लॅपटॉपचे माध्यमातून सट्टा लावताना व घेताना मिळुन आले.
सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले सॅमसंग तसेच अँपल कंपनीचे एकूण 22 मोबाइल फोन, लेनोवो कंपनी चे 2 लॅपटॉप, 1 वायफाय राउटर असा एकूण 7,45,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे