| तळा | वार्ताहर |
तळा शहरात शालेय क्रीडा स्पर्धेच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असून, ज्या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू असते, अशा रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या स्पर्धा घेतल्या जात असल्याचा आरोप नगरसेवक रितेश मुंढे यांनी केला आहे.
क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड यांच्या वतीने तळा तालुका शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन गो.म. वेदक विद्यालयाच्या मैदानावर दि.10 ते 12 या कालावधीत करण्यात आले आहे. या मैदानावर कबड्डी, खो-खो या स्पर्धा पार पडल्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या स्पर्धा या तळा-आगरदांडा रस्त्यावर वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी घेण्यात आल्या. तसेच या स्पर्धा सुरू असताना वाहनांची ये-जाही सुरू होती. त्यामुळे आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. अशा वेळी एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्नदेखील नगरसेवक रितेश मुंढे यांनी उपस्थित केला जात आहे.