गणेशभक्तांची लालपरीला पसंती

1300 बसेसची बुकिंग हाऊसफुल्ल
महामार्गावर ब्रेकडाऊन बस आणि दुरुस्ती पथक तैनात
। अलिबाग । भारत रांजणकर ।
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लालपरीला गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची पहिली पसंती मिळत आहे. 10 सप्टेंबरपासून सुरु होणार्‍या गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यातून सुमारे 1300 एसटी बसेसची बुकिंग झाली असून, गणेशभक्तांना प्रवासात अडचण येऊ नये यासाठी महामार्गावर ब्रेक डाऊन बस आणि दुरुस्ती पथक नेमण्यात आल्याची माहिती विभागय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
गणेशोत्सव सणावर यावर्षीही कोरोनाची टांगती तलवार असली तरी गणेशभक्त हे आपल्या आवडत्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात दाखल होणार आहेत. कोकणात जाणार्‍या जिल्ह्यातील चाकरमानी गणेशभक्तांसाठी राज्य परिवहन विभाग रायगड हा सज्ज झाला आहे. राज्य परिवहन रायगड विभागाने प्रवाशाच्या आरोग्याची काळजी घेतली असून, सर्व बसेस ह्या अँटी मायक्रोवेअर कोटीन बॅक्टेरियल स्प्रेने निर्जंतुक केल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास हा सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. अलिबाग, पेण आगारातील सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण पूर्ण झाले असून, महाड आणि इतर आगारातील बसेसही लवकरच निर्जंतुक केल्या जाणार आहेत.
रायगड जिल्ह्यातूनही रत्नगिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार्‍या चाकरमानी याची संख्या मोठी आहे. रायगड जिल्ह्यातून एसटी बसने जाणार्‍या गणेशभक्तांनी आगामी बुकिंग केली आहे. जिल्ह्यातून 1300 बसेसची बुकिंग झाली असून, अजून दीडशे ते दोनशे एसटी बसेसची बुकिंग होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी रायगडातून कोकणात गणेशोत्सवसाठी जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यावर्षी राज्य परिवहन विभागाला बुकिंग मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे.

भक्तांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी बसेस अँटी मायक्रोवेअर कोटीन बॅक्टेरियल स्प्रेने निर्जंतुक करण्यात आल्या आहेत. या स्प्रेचा प्रभाव सहा महिने टिकून राहणार असल्याने प्रवास आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित होणार आहे.
अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, रायगड विभाग

परिवहन विभाग सज्ज
एसटी बस ही महामार्गावर काही कारणास्तव बंद पडल्यास त्या त्वरित दुरुस्त व्हाव्यात यासाठी ठिकठिकाणी दुरुस्ती पथके तैनात केली आहेत. रामवाडी, वाकण फाटा, सुखेळी खिंड, लोणारे फाटा, कशेडी घाट याठिकाणी ब्रेकडाऊन बस आणि पथक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच रोहा, माणगाव, पेण, महाड येथेही दुरुस्ती पथक तयार ठेवण्यात आली आहेत.

Exit mobile version